समर्थ नगरातील रहिवासी व व्यवसायाने रिक्षाचालक असलेला गोवर्धन गिऱ्हेपुंजे यांना काही दिवसांपासून बंगलोरहून राजहंस नामक यांचा फोन येत होता. फोनवरून गोवर्धन यांना वारंवार २ लाख रुपयांचे कर्ज देण्याविषयी बोलत होता. गोवर्धन हे आर्थिक अडचणीत असल्याने फोनवरील भूलथापांना बळी पडले. सोमवार दि. ८ मार्च रोजी फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यावर २० हजार रुपये जमा केले. त्यानंतर कर्जाची रक्कम जमा होण्याची वाट पाहू लागला. पैसे जमा होत नाही म्हणून गोवर्धनने डॉ. राजहंस नामक व्यक्तीच्या भ्रमणध्वनीवर फोन लावला. त्यांनी दिलेले दोन्ही मोबाइल नंबर बंद यायला सुरवात झाली. आपण फसवले गेल्याची जाणीव झाली. या बाबीचा जोरदार मानसिक आघात गोवर्धनच्या मनावर झाला. त्यांनी राहत्या घरीच आत्महत्या केली. घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली. यात कुटुंबातील कोणालाही दोषी ठरवू नये. सर्वांना माझा नमस्कार असे लिहून ठेवले आहे.
सदर घटनेची नोंद लाखनी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत. तपास पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे यांच्या नेतृत्वात एपीआय विजय हेमणे, पोलीस नायक पठाण करीत आहेत.