भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटनेने महाराष्ट्र हादरला
ज्ञानेश्वर मुंदे/ सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोविडने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले असतानाच भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत दहा अर्भकांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला. तीन नवजात होरपळून मरण पावले तर सातजणांचा गुदमरून अंत झाला. या दुर्घटनेने उभा महाराष्ट्र तसेच देशही हादरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देतानाच मृत शिशूंच्या पालकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. राज्यातील सरकारी इस्पितळांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
ही आग शॉर्टसर्किटने लागली की इनक्युबेटर जळाल्यामुळे, याचा तपास केला जात आहे. विधानसभाध्यक्ष नाना पटोले, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींनी घटनास्थळाला भेट दिली. दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. अग्नितांडवात दहा अर्भकांचा मृत्यू
झाला. त्यात उसगाव (ता. साकोली) येथील हिरकन्या हिरालाल भानारकर, मोहाडी तालुक्यातील जांबच्या प्रियांका जयंत बसेशंकर, टाकला येथील दुर्गा विशाल रहांगडाले, उसरला येथील सुकेशनी धर्मपाल आगरे, तुमसर तालुक्यातील सीतेसारा आलेसूर येथील कविता बारेलाल कुंभारे आणि भंडारा तालुक्यातील भोजापूरच्या गीता विश्वनाथ बेहरे व रावणवाडी येथील वंदना मोहन सिडाम, तसेच मोरगाव अर्जुनी (जि. गोंदिया)च्या सुषमा पंढरी भंडारी यांच्या पोटी जन्मलेल्या मुलींचा, तर श्रीनगर पहेला (ता. भंडारा) येथील योगिता विकेश धुळसे यांच्या मुलाचा समावेश आहे. याशिवाय बेवारस स्थितीत सापडलेल्या बाळाचा जीव गेला. दीक्षा दिनेश खंडाईत यांच्या दोन जुळ्या मुली, श्यामकला शेंडे, अंजना युवराज भोंडे, चेतना चाचेरे, करिश्मा कन्हैय्या मेश्राम व सोनू मनोज मारबते अशा सहा मातांच्या सात मुली मात्र वाचविण्यात रुग्णालयातील कर्मचारी व इतरांना यश आले.
प्रचंड पोलीस बंदोबस्त, नऊच्या आधी शवविच्छेदनn जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद खंडाते पहाटे ३ वाजताच रुग्णालयात दाखल झाले. आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल पहाटे साडेपाचला पोचले. n घटनेची माहिती शहरात पसरताच सकाळी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यामुळे आधी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला व नंतर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यांना पाचारण करण्यात आले. n दहापैकी एक बाळ लाखांदूर येथे बेवारस स्थितीत आढळले असल्याने उरलेल्या नऊ बाळांचे मृतदेह शवविच्छेदन पूर्ण करून सकाळी नऊच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले व शासकीय वाहनाने पालकांना गावी रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी कदम यांनी घटनेचा प्राथमिक अहवाल सरकारकडे पाठविला आहे.
आसमंत भेदणारा बाळंतिणींचा हंबरडाआग लागताच बाहेर थांबलेल्या माता व त्यांच्या कुटुंबीयांनी नवजात कक्षाकडे धाव घेतली. ओल्या बाळंतिणी व त्यांचे नातेवाईक डॉक्टर व नर्सेसमागे धावत होते. प्रशासनाने सगळ्या मातांना पोर्चमध्ये बसवून ठेवले. नेमके कुणाचे बाळ दगावले व कुणाचे वाचले, हे बराच वेळ स्पष्ट होत नव्हते. इनबॉर्न विभागातील मुले वाचल्याचे स्पष्ट झाले व दिलासा मिळाला पण आऊटबॉर्न विभागात आग व धूर अधिक होता. तिथली मुले संकटात असल्याचे समजताच झालेला मातांचा आक्रोश सुरू झाला.
उच्चस्तरीय चौकशीचे सरकारचे आदेश, राज्यभर होणार फायर ऑडिट
असा घडला प्रकारया कक्षातून शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास अचानक धूर निघत असल्याचे रात्रपाळीवरील परिचारिकेच्या लक्षात आले. दार उघडले असता कक्ष धुराने भरला होता. प्रशासनाने परिचारिकेचे नाव जाहीर करण्यास नकार दिला. वैद्यकीय अधिकारी व अग्निशमन दलाचे जवान पोहोचल्यानंतर दरवाजा तोडून अंधारलेल्या कक्षातून टॉर्च व मोबाईलच्या प्रकाशात अर्भकांना बाहेर काढले. कक्षात कमी वजनाची, मुदतपूर्व जन्मलेली बालके उपचारार्थ ठेवली जातात. रुग्णालयाबाहेर प्रसूती झालेल्या मातांच्या दहा बाळांचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या बाळांमध्ये आठ मुली व दोन मुले आहेत.रुग्णालयात जन्मलेल्या (इनबॉर्न) सात बाळांना वाचविण्यात यश आले. वाचविलेल्या सर्व सात मुली आहेत.
रक्ताचा 'भंडारा'शिशूंचा अकांतविव्हळे गाभारा ।रक्ताचा 'भंडारा'उधळला ।।कोवळी पालवीएकाकी पेटली ।ज्योत ती विझलीनवोन्मीषी ।।काळीज थरारदूध साय - माय ।हंबरते गायअर्धमेली ।।वाणी ती थिजलीकसा करु देवा ।तुझा आज धावातू पत्थर ।।कळ्या कुस्करल्याप्राणांचे निर्माल्य ।जळले वात्सल्यतांडवात ।।पान्हा तो दाटलाकुठे माझा तान्हा ।काय त्यांचा गुन्हासांगा कुणी ।।थरारु दे तुझीसावळ्या रे वीट ।वात्सल्याचे काठरिते रिते ।।कूस करपलीकोळसा नाळेचा ।घाव अंंतरीचान सोसवे ।।सह्याद्री हुंदकाथरकाप होतो ।एकाकी रडतोमहाराष्ट्र ।।- जिजाबराव वाघ