अवकाळीने तीन एकर शेती उद्ध्वस्त; भरपाई १०८० रुपये !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 04:25 PM2024-04-26T16:25:45+5:302024-04-26T16:26:28+5:30
Bhandara : शेतकऱ्यांची थट्टा; तीन सदस्यीय पथकाच्या सर्वेक्षणाचा दोष
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा): गत वर्षात अवकाळी पाऊस झाला. पावसाने धानाचे कडपे ओलेचिंब झाले. पाण्यात धानाचे कडपे भिजल्याने कॉब फुटले. नुकसानग्रस्त धान पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्रिसदस्यीय पथकाच्या सर्वेक्षणाने क्रूर थट्टाच केल्याची बाब निदर्शनास आली आहे. देवरी देव येथील शेतकरी आणि उपसरपंच राजेश अंबुले यांचे बाबतीत संतापजनक प्रकार घडला आहे. तीन एकर जागेतील धान पिकांचे नुकसानभरपाई १०८० रुपये देण्यात आले आहे. सरासरी त्यांना ९८० रुपयेच प्राप्त झाले आहेत. यात सर्वेक्षण करणारे पथक दोषी आहेत, असा सवालही उपस्थित झालेला आहे.
राज्य शासनाने अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक या त्रिसदस्यीय समितीने शेतकऱ्यांचे धान पिकांचे सर्वेक्षण केले होते. प्रत्यक्षात शेतात जाऊन हे सर्वेक्षण करण्यात आले होते. देवरी देव येथील शेतकरी आणि उपसरपंच राजेश अंबुले यांचे तीन एकर आर शेतीतील धानाचे कडपे सडले होते. धानाला कोंब फुटले होते. प्रचंड नुकसान झाले होते. परंतु शासकीय मदत प्राप्त होताना उलटेच झाले आहे. अवकाळी पावसाने धान पिकांचे नुकसान झाल्याचे कारणावरून त्यांचे बचत खात्यात १०८० रुपये प्राप्त झाले आहेत. नुकसानीचा आकडा मोठा असताना मदत आखडती देण्यात आली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतीची आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी आधी शेतकऱ्यांनी केवायसी केले. सेतू केंद्रावर त्यांना १०० रुपयांचा खर्च आलेला आहे. आर्थिक मदत १०८० हजार रुपये देण्यात आली आहे. प्रत्यक्षात त्यांचे हातात ९८० रुपयेच प्राप्त झाले आहेत. सर्वेक्षण करताना पारदर्शकता असल्याचे दिसून येत नाहीत.
पुन्हा सर्वेक्षणाचे निर्देश
तुमसर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धान पिकांचे नुकसान झाले आहेत, धानाचे पीक जमीनदोस्त झाले आहेत. २२ ते २३ एप्रिल २०२४ पर्यंत नुकसानग्रस्त धान पिकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश तहसीलदार मोहन टिकले यांनी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना दिले आहे. • २४ एप्रिल २०२४ चे हे आदेशीत पत्र आहे. २५ एप्रिलपर्यंत कुणीही शेत शिवारात फिरकले नाहीत. उशिरा सर्वेक्षण होत आहे. शेतकऱ्यांना धानाचे पीक सुरक्षित करण्याची घाई राहत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होणार आहे. पारदर्शक पद्धतीने सर्वेक्षण झाले पाहिजे, असा सूर आहे.
तीन एकर शेतीत असणाऱ्या धानाचे पीक सडले होते. अवकाळी पावसाचा फटका बसला होता. मात्र आर्थिक मदत फक्त १०८० रुपये देण्यात आली आहे. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच आहे. हा शेतकऱ्यांचे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून न्याय मिळाला नाही.
- राजेश अंबुले, शेतकरी, देवरी देव.