पावसाळ्यात सापांपासून सावधान; जिल्ह्यात विषारी सापांच्या चार प्रजाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:47+5:302021-06-16T04:46:47+5:30
भंडारा : गत काही वर्षांत नागरीकरण वाढत आहे. जंगलांचा आकार कमी होतो आहे. त्यामुळे मानवी वस्तीलगत साप आढळून येतात. ...
भंडारा : गत काही वर्षांत नागरीकरण वाढत आहे. जंगलांचा आकार कमी होतो आहे. त्यामुळे मानवी वस्तीलगत साप आढळून येतात. साप हासुद्धा एक जीवच आहे. मात्र, पावसाळा सुरू होताच साप आढळण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी साप आढळल्यास घाबरून न जाता सावधान होणे आवश्यक आहे. वेळीच सर्पमित्राला पाचारण करणे योग्य आहे.
सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये सापाचा समावेश होत असतो. अनेकदा शेतशिवार किंवा घरात साप आढळून येतात. पावसाळ्याच्या दिवसात बिळामध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर येतात. अशावेळी नागरिक घाबरून जातात. घाबरून न जाता वेळीच सर्पमित्राला किंवा वनविभागाला कळवावे. विशेष म्हणजे विषारी व बिनविषारी साप कोणते हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते. पावसाळ्यात निघणारे साप हे बहुधा बिनविषारी असतात. मात्र, अनेकदा सापाने दंश केला म्हणून नागरिक मनावर ताण घेतात. भीतीपोटी प्रचंड त्रास करून घेतात. याचाच आघात शरीरावर होऊन वेळप्रसंगी जीवही जातो. त्यामुळे तत्काळ सर्पमित्रांना बोलावून सापाला पकडण्यात हीच महत्त्वाची बाब आहे.
घाेणस... घोणस हा जाडसर आणि बोजड शरीराचा साप असून सु. १.६ मी. लांबीचा असतो. शरीराच्या मधल्या भागाचा घेर सु. १५ सेंमी. असून शरीर दोन्ही बाजूंना निमुळते होत गेलेले असते. डोके मोठे, चपटे व त्रिकोणी आणि मानेपासून वेगळे दिसते. डोके व पाठीवर लहान लहान शल्क (खवले) असतात.
साधा मण्यार... पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत साधा मण्यार (बंगारस सीरुलियस) आढळतो. तो वनांत राहणे पसंत करतो. पूर्ण वाढ झालेल्या मण्याराची लांबी ९०–१२० सेंमी. किंवा अधिक असते. शरीर पोलादी निळ्या रंगाचे व विष अत्यंत जहाल असते.
नागराज... आकाराने सर्वांत मोठा विषारी साप. याचे शास्त्रीय नाव ऑफिओफॅगस हॅना आहे. त्याच्या नावात जरी नाग हा शब्द असला तरी तो सामान्य नागाहून (कोब्रा) वेगळा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि आसामात आढळतो. तो हल्लेखोर आणि चपळ साप आहे.
पट्टेरी मण्यार... हा कैरात प्रकारचा साप असल्यामुळे कैरातांची बहुतेक लक्षणे यात आढळतात. हा साप बराच मोठा व दिसायला सुबक असतो. शरीरावर एकाआड एक असे काळे व पिवळे पट्टे असतात. मानेवर एक काळी खूण असते. इतर साप खाऊन हा आपली उपजीविका करतो.
साप आढळला तर...
घरापरिसरात किंवा कामाच्या ठिकाणी साप आढळला तर त्याच्यावर हल्ला चढवायचा हे योग्य नाही. साप हा अतिशय शांत असतो. ज्यावेळी त्याला धोका किंवा असुरक्षितता वाटते तेव्हाच तो दंश करतो. ही बाब आपण समजून घ्यायला हवी, असे सर्पमित्र सांगतात.
साप दिसताच घाबरून जाऊ नका. तत्काळ सर्पमित्राला संपर्क करा. साप हा शांत प्राणी असल्याने विनाकारण त्याला डिवचू नका. सर्पमित्र किंवा वन कर्मचारी येईपर्यंत गोंधळ वा हालचाल करू नका. बंदखोलीत साप आढळला असेल तर दारे, खिडक्या बंद करून घ्या, जेणेकरून साप एकाच ठिकाणी राहील.
साप चावला तर...
एखाद्या व्यक्तीला साप चावला तर त्या व्यक्तीने घाबरून जाऊ नये. कारण माणूस घाबरतो तेव्हा त्याचे हृदयाचे ठोके वाढतात. यामुळे विष अजून गतीने शरीरात पसरते. त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. ज्या जागी साप चावला तो भाग दोरीने बांधून ठेवा. ज्यामुळे विष अजून शरीरात पसरणार नाही. यानंतर साप जिथे चावला आहे त्या भागाच्या आजूबाजूला दाबून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. जर माणसाचे शरीर काळे पडायला सुरुवात झाली तर समजा विष शरीरात पसरले आहे. लगेच त्या व्यक्तीला रुग्णालयात न्यावे.
जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप
भंडारा जिल्ह्यात विरोळा (तास्या), पाणदिवड, धोंड्या, धामण, अजगर, डुरक्या घोणस, मंडोळ,, रूखइ, धुळनागीण, तस्कर, तिडक्या, कवड्या, पट्टेरी कवड्या, गवत्या, वाळा, पोवळा आदी बिनविषारी साप आढळतात. या प्रजातीच्या सापांनी दंश केला तरी कुठलाही परिणाम शरीरावर होत नाही, पण कित्येकदा साप चावला या भीतीपोटी नागरिकांचा नाहक जीव जातो.
कोट बॉक्स
साप हे मानवाचे शत्रू नाहीत. त्याला मित्र म्हणूनच बघितले पाहिजे. कुठेही साप आढळल्यास त्याची माहिती जवळच्या सर्पमित्राला द्यावी. जेणेकरून वेळप्रसंगी येऊन सर्पमित्र त्या सापाला पकडून जंगलात सोडू शकतो. साप दिसल्यास एकदम घाबरून जाऊ नये किंवा सापाने दंश केल्यास नियमित माहीत असलेल्या उपाययोजना कराव्यात.
-योगेशकुमार पशिने, सर्पमित्र,भंडारा.