भंडारा : खड्ड्यातून दुचाकी स्लीप झाल्यानंतर त्याचवेळी मागाहून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली डोके चिरडून विस्तार अधिकारी जागीच ठार झाला. ही घटना भंडारा शहरातील खांब तलाव चौकात मंगळवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. शहरातील खड्ड्यांनी गत दहा दिवसात तीन बळी घेतले.
केवळराम सहादेव पंचभाई (४२) रा. गंगानगर खात रोड खोकरला भंडारा असे मृताचे नाव आहे. ते लाखनी पंचायत समितीमध्ये महिला व बालविकास प्रकल्प विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री ते लाखनी वरुन भंडारा येथे आले. जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेऊन ते खात रोडवरील आपल्या घराकडे जात होते. खांब तलाव चौकातील खड्डेमय रस्त्यावर त्यांची दुचाकी अचानक खड्ड्यातून उसळली आणि ते दुचाकीसह खाली कोसळले. त्याचवेळी मागेहून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली त्यांचे डोके आले. अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. यावेळी वीजपुरवठा ही खंडित झाला होता आणि पाऊसही सुरू होता.
या घटनेची माहिती भंडारा शहर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तोपर्यंत ट्रक पसार झाला होता. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या अपघाताचा तपास ठाणेदार सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत.
पत्नीने ९ वाजता केला होता फोन
दररोज वेळेत घरी येणारे केवळराम मंगळवारी रात्री ९ वाजेपर्यंतही घरी आले नाही. म्हणून पत्नीने त्यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी पाऊस असल्याने जिल्हा परिषदेत थांबल्याचे सांगितले. पाऊस थांबला की घराकडे निघतो असेही सांगितले. मात्र, त्यानंतर पत्नीने १० वाजताच्या सुमारास फोन लावला तेव्हा फोन बंद येत होता. दरम्यान काही वेळात या अपघाताची माहितीच पत्नीला मिळाली. कुटुंबावर जणू आभाळच कोसळले.