बिनाखी ते गोंडीटोला गावांना जोडणाऱ्या ३ किमी अंतरच्या डांबरीकरण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. रस्त्याचे डांबरीकरण पूर्णतः उखडले आहे. मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावर असणाऱ्या पुलावर भगदाड पडले असल्याने रात्री प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर तीन पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु तिन्ही पुलांवर खड्डे पडले आहेत. जीवघेणे खड्डे पडल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अपघात झाले आहेत. या खड्ड्यात त्यांच्या सायकली कोसळल्या आहेत. परंतु प्रशासन बेखबर असल्याने गावकऱ्यांत संताप निर्माण झाला आहे. गोंडीटोला ते महालगावपर्यंत ५ किमी अंतरापर्यंत या मार्गाचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत डांबरीकरण मंजूर करण्यात आले होते. या मार्गाचा भूमिपूजन कार्यक्रम आटोपला आहे. परंतु प्रत्यक्षात कामांना सुरुवात करण्यात आलेली नाही. दरम्यान, कोरोना काळात निधी नसल्याने या मार्गाच्या कामाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे मार्गाचे डांबरीकरण रेंगाळले आहे. शासन व प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा मार्ग नागरिकांच्या जीवावर उठला असल्याचे चित्र दिसत आहे. या मार्गाचा सर्वाधिक उपयोग गोंडीटोला आणि सुकळी नकुल येथील नागरिक करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत या मार्गावर वाहनांची वर्दळ राहत आहे. परंतु मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या कारणावरून रस्त्याच्या कडेला अतिक्रमण वाढले आहे. थेट रस्त्यावर माती घालण्यात आली आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. दुहेरी वाहने धावताना वाहन चालकांच्या नाकीनऊ येत आहेत. वाढत्या अतिक्रमणमुळे मार्ग पांदण रस्त्यात परावर्तित होत आहे. यामुळे सुकळी नकुल, गोंडीटोला गावातील नागरिकांत नाराजीचा सूर आहे. दरम्यान, पुलाचे नव्याने बांधकाम करण्याची ओरड सुरू झाली आहे. या मार्गाच्या दुरुस्तीकरिता तत्काळ निधी मंजूर करण्याची मागणी भाजपचे युवा नेते किशोर राहगडाले, भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष विनोद पटले, ग्रामपंचायत सदस्या शीतल चिंचखेडे यांनी केली आहे.
बिनाखी - गोंडीटोला मार्गावरील पुलावर जीवघेणे भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 8:38 AM