भाजपने सांगावे किती गावे आदर्श झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:00 AM2019-04-01T01:00:03+5:302019-04-01T01:00:23+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व खासदारांना एक गाव निवडून त्याला आदर्श बनविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, प्रफुल्ल पटेल यांनी गोरेगाव तालुक्यातील ग्राम पाथरीची निवड केली. आज सांसद आदर्श गाव अंतर्गत गावचा चेहरामोहरा बदलला असून गावच्या विकासासह गावकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व खासदारांना एक गाव निवडून त्याला आदर्श बनविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, प्रफुल्ल पटेल यांनी गोरेगाव तालुक्यातील ग्राम पाथरीची निवड केली. आज सांसद आदर्श गाव अंतर्गत गावचा चेहरामोहरा बदलला असून गावच्या विकासासह गावकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. मात्र भाजपने आता त्यांची किती गावे आदर्श झाली हे सांगावे असा सवाल वर्षा पटेल यांनी केला.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंँग्रेस-पिरिपा-खोरिपा व मित्र पक्षाचे संयुक्त उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या गोरेगाव तालुक्यातील प्रचार सभांत त्या रविवारी (दि.३१) बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, पी.जी.कटरे, राजलक्ष्मी तुरकर, वैशाली तुरकर, केवल बघेले, डेमेंद्र रहांगडाले,राजू भेलावे, महेंद्र चौधरी, श्रीप्रकाश रहांगडाले, जितेंद्र कटरे यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. पुढे बोलताना पटेल यांनी, घोषणाबाजी करणाऱ्या मोदी लहरीत सन २०१४ मध्ये प्रफुल्ल पटेल यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यानंतरही क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पक्षाने त्यांना राज्यसभेतून खासदार बनविले. आपला जिल्हा धान उत्पादक जिल्हा असून येथील शेतकरी फक्त शेतीवरच अवलंबून आहेत.
मोदींनी सरकार सत्तेवर येताच संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करणार असे म्हटले होते. मात्र घोषणाबाजांनी घोषणा केली विसरून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा करणाºयांसोबत काय करावे हे जतनेला चांगलेच माहिती आहे.