रोखपाल व तलाठी लाच घेताना अडकले जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:34 PM2018-02-05T22:34:28+5:302018-02-05T22:34:50+5:30

मोहाडी पंचायत समितीचे रोखपाल व भंडारा तालुक्यातील खरबी येथील तलाठी यांना दोन वेगवेगळया गुन्ह्यात लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.

Cashier and talathi are caught stuck in a bribe | रोखपाल व तलाठी लाच घेताना अडकले जाळ्यात

रोखपाल व तलाठी लाच घेताना अडकले जाळ्यात

Next
ठळक मुद्देमोहाडी, खरबी येथील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

आॅनलाईन लोकमत
भंडारा : मोहाडी पंचायत समितीचे रोखपाल व भंडारा तालुक्यातील खरबी येथील तलाठी यांना दोन वेगवेगळया गुन्ह्यात लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. ही कारवाई भंडारा व नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. या कारवाईने पंचायत व महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
अखिल भुवण पारधी (३८) असे मोहाडी येथील रोखपाल तर राजेंद्र सिंग सोलंकी (५७) असे खरबी येथील तलाठ्याचे नाव आहे. अखिल पारधी यांना पाच हजार रुपयांसह तर राजेंद्र सोलंकी यांना सहा हजार रुपयाच्या रक्कमेसह रंगेहात पकडण्यात आले.
मोहाडी पंचायत समिती
मोहाडी पंचायत समितीचे रोखपाल (कनिष्ठ सहायक) अखिल पारधी यांच्याकडे तक्रारदार यांनी शेतीवर धडक सिंचन विहिरी योजनेंतर्गत २०१७ मध्ये मंजूर झालेल्या २ लाख ५० हजार रुपयांचा मंजूर झालेल्या निधीबाबद विचारणा केली. यावर अखिल पारधी यांनी तक्रारदार यांना सदर योजना त्यांच्या वडीलांच्या नावाने मंजूर झाली असून निधी वडीलांच्या खात्यावर जमा करुन देतो असे सांगून पाच हजार रुपयांची मागणी केली. यानंतर उर्वरित रकमेकरिता पारधी यांनी पुन्हा पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी पारधी यांची तक्रार भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीनुसार सापळा रचून पारधी यांना पंचायत समिती परिसरातच आज सोमवारला पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी पारधी यांच्या विरुध्द मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, पोलीस कर्मचारी गणेश पडवाल, गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, शेखर देशकर, निलेश मेश्राम यांनी केली.
खरबी साझा तलाठी
आई-वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर असलेली खरबी येथील शेतजमीन वारसा हक्काने चार भावांचे नावे चढवून फेरफार घेण्याचा प्रकरणी खरबीचे तलाठी राजेंद्रसिंग सोलंकी यांनी तक्रारीकर्त्यांना सहा हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार व त्यांचा चार भावांनी वडीलोपार्जित जमिनीचे कागदोपत्री हिस्सेवाटणी करुन घेण्याकरिता भंडारा दुय्यम निबंधक कार्यालयात पाच भावांमध्ये शेतजमीनीचे हिस्सेवाटे नोंदणीकृत करुन घेतले. त्यानंतर रजिस्ट्रीच्या आधारे प्रत्येकांचे नावे वेगवेगळे करुन घेण्याकरिता खरबी साझाचे तलाठी यांच्याकडे अर्ज केला. फेरफार संबंधात तक्रारदार हे तलाठी राजेंद्रसिंग सोलंकी यांना भेटले असता त्यांनी फेरफार घेण्याकरिता सहा हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदार यांनी तलाठी राजेंद्रसिंग सोलंकी यांच्याविरुध्द नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन सोमवारला सापडा रचला. दरम्यान तक्रारदार यांच्याकडून सहा हजार रुपये स्विकारतांना तलाठी सोलंकी यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी तलाठी सोलंकी यांच्याविरुध्द जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार करुन अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, पोलीस कर्मचारी गजानन गाडगे, शंकर कांबळे, दिप्ती मोटघरे, रेखा यादव यांनी केली.

Web Title: Cashier and talathi are caught stuck in a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.