भाजपला रोखण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 02:53 AM2019-07-27T02:53:45+5:302019-07-27T06:35:25+5:30
विधानसभेला इच्छुकांची गर्दी : युती-आघाडीनंतर होणार चित्र स्पष्ट, बंडखोरीची शक्यता
ज्ञानेश्वर मुंदे
भंडारा : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित मताधिक्याने भाजपमध्ये प्रचंड उत्साह असून उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढत आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा भाजपच्या ताब्यात असून तिन्ही आमदारांनी तिकिटासाठी दावा केला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कोणत्याही परिस्थितीत आघाडीचा झेंडा रोवायचा, यासाठी तयारी चालविली आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या भंडाराच्या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. ही जागा कोणाच्याही वाट्याला गेली तरी बंडखोरीची शक्यता आहे. मात्र युती-आघाडीच्या जागा वाटपानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार असून सध्यातरी भाजपचा गड भेदण्याचे मोठे आव्हान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढे दिसत आहे.
जिल्ह्यात भंडारा, तुमसर आणि साकोली हे तीन मतदारसंघ आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने तिनही जागावर विजय संपादित केला होता. तर २००९ मध्ये काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असे तीन पक्षाचे तीन आमदार होते. भाजपचे नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने गड राखला होता. मात्र नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपने बाजी मारली.
भंडारा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढले. यात भाजपचे रामचंद्र अवसरे विजयी झाले. आता युती झाल्यास हा मतदार संघ कुणाच्या वाट्याला जाणार याची प्रचंड उत्सुकता मतदारसंघात आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जोमाने कामाला लागली आहे. भाजपकडून आमदार रामचंद्र अवसरे, आशिष गोंडाने तर काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, राजकुमार राऊत आणि राष्ट्रवादीतर्फे चेतक डोंगरे, महेंद्र गडकरी, नितीन तुमाने, डॉ. रवींद्र वानखेडे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेतर्फे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर निवडणूक लढणार हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला साकोली मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे राजेश काशीवार विजयी झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपुरात निवडणूक लढलेले माजी खासदार नाना पटोले यांची काँग्रेसकडून उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये दावा ठोकून आहेत. डॉ. अजय तुमसरे, होमराज कापगते यांची नावेही चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून संजय केवट यांनी निवडणूक लढण्याची तयारी चालविली आहे.
तुमसर विधानसभा मतदारसंघ युतीत भाजपच्या वाट्याला तर आघाडी काँग्रेसच्या वाट्याला आहे. या मतदारसंघावर भाजपचा दावा असून विद्यमान आमदारही भाजपचा आहे. उमेदवारीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत घमासान सुरू आहे. भाजपने जोरदार तयारी चालविली आहे. आपल्यालाच तिकीट मिळेल, अशी आमदार चरण वाघमारे यांना खात्री आहे. या सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले तर काँग्रेसतर्फे डॉ. पंकज कारेमोरे, प्रमोद तितीरमारे आणि राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार अनिल बावनकर, माजी खासदार मधुकर कुकडे, राजू कारेमोरे व योगेश सिंगनजुडे यांची नावे चर्र्चेत आहेत. वंचित आघाडी, बसपा कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. गत निवडणुकीत भंडारा मतदार संघात बसपाच्या विजया गाढवे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.
एकूण जागा : ३ । सध्याचे बलाबल भाजप-०३, कॉँग्रेस-००, राष्ट्रवादी-००
सर्वांत कमी मताधिक्क्याने पराभव साकोली : सेवक वाघाये (काँग्रेस) २५ हजार ४९८ (विजयी : राजेश काशिवार, भाजप)
२०१४च्या निवडणुकीत सर्वांत मोठा विजय भंडारा : रामचंद्र अवसरे (भाजप) फरक : ३६ हजार ८३२