साकोली नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचे प्रशासकी कारणास्तव वर्धा येथे सहायक आयुक्त म्हणून स्थानांतरण मार्च महिन्यात झाले होते. मात्र, या आदेशाला त्यांनी मॅटमध्ये आवाहन दिली. मॅटने त्यांना दोन आठवडे साकोली येथे रूजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र, १५ दिवसांनंतर मुख्याधिकारी मडावी यांनी मॅटमधील आपले प्रकरण मागे घेतले. प्रकरण मागे घेताच मडावी यांचे स्थानांतरण पूर्ववत वर्धा येथे झाले. साकोली येथून स्थानांतरण झाल्याने त्यांचा प्रभार लाखांदूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सौरव कावळे यांना देण्याचा आदेश बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. गुरुवारी त्यांना साकोली येथे प्रभार स्वीकारण्यास सांगितले. तसेच अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचेही म्हटले होते. या आदेशानुसार मुख्याधिकारी कावळे गुरुवारी दुपारी साकोली येथे आले. मात्र मुख्याधिकारी माधुरी मडावी उपस्थित नव्हत्या. त्यामुळे कावळे यांना प्रभार न घेताच परत जावे लागले.
कावळे यांनी नगराध्यक्ष धनवंता राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली. शुक्रवारी प्रभार घेण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. चर्चेच्यावेळी नगरसेवक हेमंत भारद्वाज, सभापती अनिता पोगळे, नगरसेवक लता कापगते आदी उपस्थित होते.
बॉक्स
राजकीय गोटात चर्चा
स्थानांतरीत मुख्याधिकारी माधुरी मडावी प्रभार देण्यासाठी गैरहजर का राहिल्या, यावरून साकोलीच्या राजकीय गोटात चर्चांना उधाण आले होते. मुख्याधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रभार का दिला नाही, यावरही तर्कवितर्क सुरू आहे.