लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासून तयारी करावी. सध्या ऑक्सिजनचा जिल्ह्यात पुरेसा साठा असून, जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त सिटीस्कॅन युनिटसह तुमसर आणि पवनी येथील रुग्णालयात सिटीस्कॅन युनिट उभारले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी येथे दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी खासदार पटेल बोलत होते. बैठकीला आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव उपस्थित होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सिटीस्कॅनचा मुद्दा ऐरणीवर आला होता. गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयातून सिटीस्कॅन करावी लागत होती. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत होता. आता लवकरच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिरिक्त सिटीस्कॅन युनिटसह तुमसर आणि पवनी येथेही सिटीस्कॅन युनिट सुरू करण्यात येणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून दोन युनिट आणि जिल्हा नियोजन समितीतून एक युनिट उभारले जाणार असल्याची माहिती खासदार प्रफुल पटेल यांनी दिली. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने काय तयारी केली याची माहिती खासदार पटेल यांनी घेतली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. पीयूष जक्कल यांनी टीबी वॉर्डात लहान मुलांसाठी ५० बेडचे कोविड केअर युनिट उभारले जाणार आहे. तसेच बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आल्याची माहितीही दिली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, धनंजय दलाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. माधुरी माथूरकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
सीएसआर अदानी फाउंडेशनकडून मिळालेल्या ५० ऑक्सिजन सिलिंडर्सचे लोकार्पण - सीएसआर अदानी फाउंडेशनकडून मिळालेल्या ५० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर्सचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. अदानी समूहाने कोरोना संकटात जिल्ह्याला मोठी मदत दिली. या ५० ऑक्सिजन सिलिंडरसोबतच आवश्यकतेनुसार आणखी १०० सिलिंडर भंडारा जिल्ह्याला दिले जाणार आहेत. तसेच १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार असल्याचे खासदार पटेल यांनी सांगितले. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सीएसआर अदानी फाउंडेशनचे नितीन शिराळकर, अदानी समूहाचे उपमहाव्यवस्थापक प्रवीण जयस्वाल उपस्थित होते.रब्बी धान खरेदी तत्काळ सुरू करा- जिल्ह्यात अद्यापही रब्बी हंगामातील धान खरेदीला प्रारंभ झाला नाही. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होईल. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदी तत्काळ सुरू करण्याचे निर्देश खासदार पटेल यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम यांना दिले.