एका ‘क्लिक’वर कळणार शाळेचा दर्जा
By admin | Published: February 17, 2017 12:42 AM2017-02-17T00:42:51+5:302017-02-17T00:42:51+5:30
शालेय विद्यार्थी व पालकांना शाळेची गुणवत्ता एका क्लीकवर कळावी, यासाठी शासनाच्या वतीने राज्यस्तरावर शाळा सिध्दी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
संकेतस्थळाची निर्मिती : गुणवत्ता ठरविण्यासाठी शासनाचा शाळा सिद्धी उपक्रम
रविंद्र चन्नेकर बारव्हा
शालेय विद्यार्थी व पालकांना शाळेची गुणवत्ता एका क्लीकवर कळावी, यासाठी शासनाच्या वतीने राज्यस्तरावर शाळा सिध्दी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शाळेच्या गुणवत्तेचा दर्जा ठरविण्यासाठी आता शासनाच्या वतीने शाळेतील शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता आदीचे मुल्यांकन होणार आहे. यासाठी राज्य शासनाने शाळा सिध्दी उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमात शाळांना आॅनलाईन पध्दतीने नोंदणी करावयाची आहे. स्वयं मुल्यमापनातून शाळेची श्रेणी ठरणार आहे. पालकांना आपल्या पाल्यासाठी शाळेची निवड करताना शाळेची गुणवत्ता कशी आहे हे त्या माध्यमातून एका क्लीकवर कळणार आहे. शाळेचा दर्जा ठरविण्यासाठी देशात एकच निकष ठेवण्यात आले आहे. शाळाबाह्य चौकशी करतांना इंटरनेटवर माहिती उपलब्ध केली जाणार आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या संकेत स्थळावर शाळाबाह्य माहिती दिली जाईल. शाळांना अ, ब, क असा दर्जा दिला जाईल.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत आणखी एका नव्या उपक्रमाची भर पडली आहे. शाळा निहाय उपक्रमाचे शाळेने राबविलेले उपक्रम नियमित सुरु राहावेत उपक्रमातील सातत्य टिकावे हा यामागील उद्देश आहे.
विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भौतीक सुविधा गुणवत्तेच्या सुविधा यासाठी शाळेत राबविण्यात येणारे हसत खेळत ईलर्निंग याचा देखील या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान शाळेच्या शैक्षणिक दर्जाची माहिती यापूर्वी खासगी संस्थेच्या माहितीतून होत होती. आता राज्य शासनाने हा नवा उपक्रम सुरु केला आहे. यामधून पालकांना आपल्या परिसरातील कोणत्या शाळेत प्रवेश दयायचा याचीही माहिती आॅनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
३० मार्च २०१६ च्या शासन निर्णयानुसार शाळेची मानांकन करण्यात येत आहे. त्यामुळे समृध्द शाळांना राष्ट्रीय स्तरावरुन मानांकन मिळेल आणि त्यामुळे एक सकारात्म्क स्पर्धा निर्माण होईल व जास्तीत जास्त शाळा समृध्द करण्यासाठी, विद्यार्थी प्रगत करण्यासाठी ही प्रणाली फायदेशीर ठरणार आहे.
या शाळा सिध्दी उपक्रमात सहभागी होणाऱ्या शाळांच्या मुल्यमापनासाठी समिती नेमण्यात येणार आहे. या समितीचे स्वरुप अद्यापही निश्चित नाही. शाळा सिध्दी उपक्रमाच्या नोंदणीसाठी १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत मूदत देण्यात आली होती.
समितीचे स्वरुप स्पष्ट न करता अखेरीच मूदत देण्यात आल्याने शाळा प्रशासन मात्र द्विधा मनस्थितीत आहेत. नेमकी कोणाच्या प्रकारची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी समितीचे मार्गदर्शन आवश्यक आहे.