लाखांदूर: बोगस चालानद्वारे राशन दुकानदारांच्या कमिशनचा घोटाळा करून लाखोंची अवैध वसुली केल्याचा आरोप होताच तडकाफडकी अनधिकृत संगणक परिचालकाची हकालपट्टी करण्यात आली. मात्र या सबंध गैर प्रकारासंबंधाने जिल्हा पुरवठा विभागासह तालुका प्रशासनाने कोणतीच कार्यवाही न करता बघ्याची भूमिका घेतल्याने अधिकारी व परिचालकाच्या संगनमताने कमिशन घोटाळा झाल्याच्या आरोपात्मक चर्चेला वेग आला आहे.
कोरोना काळात ऑनलाइन चालान भरणा करण्यासाठी येथील तालुका अन्न पुरवठा विभागांतर्गत अनधिकृतपणे एका तरुणाला काम सोपविण्यात आले. सदर तरुणाने या संधीचा गैर फायदा घेत चक्क बोगस चालानद्वारे तालुक्यातील सर्वच राशन दुकानदारांचे कमिशनमधून अधिक रक्कम कपात करून कमिशन घोटाळा केल्याची आरोपात्मक चर्चा झाली.
एवढेच नव्हे तर संबंधित परिचालकाने ऑनलाइन चालान भरणा करण्यासाठी अवैधपणे अतिरिक्त वसुली करतांना शासनाचे प्रती चालान मिळणारे १५० रुपये कमिशन देखील हडपल्याची चर्चा आहे. सदर गैरप्रकाराची तालुक्यातील राशन दुकानदारात चर्चा होऊन ‘लोकमत’मध्ये कमिशन घोटाळ्याचे वृत्त प्रकाशित होताच तालुका अन्न पुरवठा विभाग खळबळून जागे झाले.
यावेळी संबंधित विभागांतर्गत अनधिकृतपणे नियुक्त परिचालकाची हकालपट्टी करून चौकशी चालविल्याची माहिती आहे. मात्र सदर चौकशीत अनधिकृत परिचालकाने शासनाला नियमानुसार चालानद्वारे रकमेचा भरणा केल्याचे आढळून आल्याची माहिती आहे. मात्र सदर घोटाळ्यात परिचालकाने राशन दुकानदारांना बोगस चालान देऊन लुबाडल्याने सदर घोटाळ्यात अधिकारीदेखील गुंतले नसावेत ना !अशी संशयास्पद चर्चा केली जात आहे.
याप्रकरणी अद्याप घोटाळ्याच्या चौकशी संबंधाने जिल्हा पुरवठा विभागासह तालुका प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेत सदर घोटाळा दडपण्यासाठी हालचाली सुरू असल्याच्या चर्चेलदेखील वेग आला आहे.
बॉक्स
राशन दुकानदारांचा बेजबाबदारपणा उघड
अन्न पुरवठा विभागांतर्गत एका अनधिकृत परिचालकाकडून बोगस चालानद्वारे कमिशन घोटाळा झाल्याची चर्चा झाली. या परिचालकाने कोरोना काळात ऑनलाइन चालान भरणा करण्याच्या नावाखाली अनेकांना हजारोने गंडविले . मात्र याप्रकरणात केवळ घोटाळ्याची चर्चा होतांना तालुक्यातील एकाही राशन दुकानदाराने यासंबंधाने येथील तालुका प्रशासनाकडे कोणतीच तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती येथील तहसीलदार निवृत्ती उइके यांनी दिली आहे. यासंबंध गैर प्रकारात राशन दुकानदारांचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरल्याचे बोलल्या जात आहे.