फोटो
भंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागात रिक्त असलेल्या जागांवर अनुकंपा पदभरती अंतर्गत विलंब होत असल्याची बाब उघडकीला आल्यानंतर पदभरतीची मागणी करण्यात आली होती. मात्र ही मागणी पूर्ण न झाल्याने अनुकंपाधारकांनी १८ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी भेट देत आश्वासन दिल्यानंतर अनुकंपा धारकांनी आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी माजी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, यशवंत सोनकुसरे यांच्यासह अनुकंपाधारक उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत १९८ अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. जवळपास दीड दशकाचा कालावधी लोटूनही त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. राज्य शासनाच्या निर्णयानुसार सहा महिन्याचा कालावधी लोटून गेला असला तरी, जिल्हा परिषद प्रशासनाने अनुकंपा पदभरती प्रक्रिया सुरू केली नाही. अनुकंपा भरतीसाठी १९८ उमेदवार प्रतीक्षेत आहेत. १२ ते १३ वर्षांपासून ते या पदभरतीची वाट बघत आहेत. तसेच महाराष्ट्रातील २० ते २५ जिल्हा परिषदांतर्गत भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. परंतु भंडारा जिल्हा परिषदेत भरती प्रक्रिया अजूनही रखडली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देत १८ जानेवारीपासून जि.प.समोर धरणे आंदोलन सुरू केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अनुकंपाधारकांची भेट घेत त्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करून यादी मंजूर करण्यात येइल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी मंगेश माकडे, चेतन सेलोकर, विद्याधर डुंबरे, सचिन भोयर, महेश मस्के, उमेश डोंगरवार, राजकुमार टेकाम, जितेंद्र कांबळे, दिलीप नागरीकर, संदीप बावनकुळे, ज्ञानेश्वर कडव, चेतन काळे, धीरजकुमार रामटेके, अभिलाष आकरे आदी उपस्थित होते.
बॉक्स
यासंदर्भात गणेशपूर येथील आदर्श युवा मंचतर्फे या अनुकंपाधारकांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला होता. यावेळी मंचचे अध्यक्ष पवन मस्के यांच्यासह पदाधिकारी तसेच अनुकंपाधारक उपस्थित होते.