भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गाची स्थिती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:22 AM2021-07-12T04:22:40+5:302021-07-12T04:22:40+5:30
भंडारा शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या साईडपट्टीवर मोठमोठे खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी रस्ता उंच-खोल झाला आहे. साईडपट्ट्यावरून ...
भंडारा शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या साईडपट्टीवर मोठमोठे खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी रस्ता उंच-खोल झाला आहे. साईडपट्ट्यावरून रस्त्यावर गाडी आणताना दुचाकीधारकांना प्रचंड कसरत करावी लागते. अवजड वाहने अतिवेगाने जात असतात. अशावेळी दुचाकीधारकांना आपले वाहन रस्त्याचा कडेला घेताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वर्षानुवर्ष प्रचंड प्रमाणात टोल वसुली होत असताना वाहनधारकांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याने अनेकांची ओरड सुरू आहे. या साईडपट्ट्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. भंडारा शहरात तर प्रचंड दुरवस्था पाहायला मिळत आहे. तहसील कार्यालय, आरटीओ ऑफिस, जिल्हा परिषद चौक, नागपूर नाक्यापर्यंत रस्त्याकडेला धक्कादायक स्थिती निर्माण झाली आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत. लाखोंची टोलवसुली होत असताना त्या तुलनेत रस्ता दुरुस्ती अथवा वाहनधारकांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जात नाहीत, असाही प्रश्न कायम आहे.