पवनी : उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पवनी येथील शिरस्तेदार,मुख्यालय सहायक,प्रतिलिपी लिपिक व इतर कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पवनी शहर व तालुक्यातील नागरिक त्रस्त आहेत.याबाबत शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी जिल्हा काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीकडे सतत तक्रारी करीत होते. यासंदर्भात तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख भंडारा यांच्याकडे ४ जानेवारी रोजी निवेदन दिले. त्यानंतर भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे १ मार्च रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यात तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पवनी येथील शिरस्तेदार, मुख्यालय सहायक, प्रतिलिपी लिपिक व इतर कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाज सुरळीतपणे करता येईल, यावर लक्ष घालावे. अन्यथा भूमी अभिलेख कार्यालयाला टाळेबंद आंदोलन करण्यात येईल अशी ताकीद देण्यात आली होती,परंतु निवेदनात नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांची कुठलीही चौकशी करण्यात आली नाही अथवा कार्यालयातील कामकाजात कुठलाही बदल झाला नाही.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विकास राऊत,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर तेलमासरे,पवनी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर उरकुडकर, पालिकेचे माजी उपाध्यक्ष धर्मेंद्र नंदरधने, तुळशीदास बिलवणे, रामचंद्र पाटील, नगरसेवक राकेश बिसने, महेश नान्हे, अक्षत नंदरधने, तुषार भोंगे यांच्या उपस्थितीत टाळेबंद आंदोलन करण्यात आले.