पुलाच्या बांधकामामुळे रहदारीचा मार्ग अडला
By admin | Published: June 22, 2017 12:27 AM2017-06-22T00:27:22+5:302017-06-22T00:27:22+5:30
दोन गावांना जोडण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात येते. मात्र कालावधी लोटल्यानंतरही पुलाचे काम सुरू आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल.
कोरंभी मार्गावरील पुल : काम कासवगतीने सुरू, शिवसेनेने दिला रस्ता दुरूस्तीचा अल्टिमेटम, अनेक नागरिक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दोन गावांना जोडण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात येते. मात्र कालावधी लोटल्यानंतरही पुलाचे काम सुरू आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल. मात्र ही परिस्थिती आहे. गणेशपूर-कोरंभी मार्गावरील वैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या पुलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची सध्या पडझड सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.
१८ महिने कालावधीत या नदीपात्रात पुलाची उभारणी करणे गरजेचे होते. गोसीखुर्द पुनर्वसन कार्यालयाच्या माध्यमातून या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. याचे कंत्राट नागपूर येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. सुमारे तीन कोटी रूपये खर्चातून या पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही पुलाची अपूर्णावस्था असल्याचा आरोप शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी केला आहे.
गणेशपूर येथून पिंडकेपार, कोरंभी, सालेबर्डी, खैरी, कवडसी, सावली, पिपरी आदी गावांना जोडणाऱ्या या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. गणेशपूर-कोरंभी मार्गावर जुना पुल असून तो पावसाळ्यात पाण्याखाली जातो. त्यामुळे येथील वाहतूक पुर्णपणे ठप्प राहते. त्यामुळे या मार्गावर नवीन पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. उन्हाळ्यातील दिवसात या पुलाच्या बांधकामाचे काम पुर्णत्वास नेण्याऐवजी ते बंद ठेवण्यात आले होते आणि आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सदर कंत्राटदाराने येथील काम पुर्ववत सुरू केले आहे. जुन्या पुलावरून मार्गक्रमण करण्यासाठी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून कंत्राटदाराने येथे मातीचे भरण करून पर्यायी मार्ग सुरू केला आहे. यावरून परिसरातील नागरिक दळणवळण करीत आहेत. मात्र पावसाचे दिवस असल्याने येथून जाणे जिकरीचे होत आहे.
येथून जाताना अनेक जण जमिनीवर येथून मार्गक्रमण करताना दुखापतग्रस्त झाले आहे. या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे. या कामाची पाहणी करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांची असतानाही या अधिकाऱ्यांनी या कामाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. वारंवार तक्रारी करूनही गोसीखुर्द पुनर्वसन विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना होणारा त्रास व सुरू असलेले संतगतीचे काम हे त्वरीत बंद करावे, असा निर्वानीचा इशारा जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी कंत्राटदाराला दिला आहे. २४ तासाच्या आत कंत्राटदारांनी नागरिकांना योग्य पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अफरातफर करण्याचा प्रकार
निर्माणाधीन पुलाच्या कामामुळे जुन्या पुलावरून वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी किंवा नागरिकांना पर्यायी व्यवस्था करावी यासाठी अंदाजपत्रकात पर्यायी मार्गाची तरतूद केली आहे. यासाठी खडीकरण करून नागरिकांना सुविधा द्यावी, असे असताना यावर होणाऱ्या खर्चाची अफरातफर करण्याच्या दृष्टीने कंत्राटदाराने येथे केवळ माती काम केले.
नागरिकांना दळणवळणाची सुविधा व्हावी यासाठी कंत्राटदाराने पर्यायी मार्ग तयार करावा. कामात होत असलेली दिरंगाई खपवून घेणार नाही. २४ तासाच्या आत सुविधा न दिल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल.
- जया सोनकुसरे, जि.प. सदस्य भंडारा.
पूलाचे काम पूर्ण झत्तलेले आहे. त्याला लागून पर्यायी रस्ता व नागरीकांची असूविधा होऊ नये यासाठी काही कामे करण्यात येत आहे. पाऊस पडल्याने पाणी साचलेले असल्याने चिखल झाले आहे. पावसामुळे व्यत्यय आला आहे. सकाळपर्यंत काम पूर्ण होईल.
- टी. एस. खडके, कार्यकारी अभियंता.