निर्माणाधीन बांधकाम एकेरी वाहतुकीसाठी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 05:00 AM2020-06-08T05:00:00+5:302020-06-08T05:00:50+5:30
कोट्यवधी रुपये खर्च करून नाकडोंगरी-तुमसर राज्यमार्गाचे नूतनीकरण करण्याचे काम वर्षभरापासून संथगतीने सुरू आहे. गावांतर्गत सिमेंटीकरण व गावाबाहेर डांबरीकरण असे या कामाचे स्वरूप आहे. राज्यमार्गावरील मेहगाव, मिटेवाणी येथे सिमेंटिकरणाचे काम काही प्रमाणात अधिक झाले आहे. मात्र चिचोली येथे केवळ एका बाजूने सिमेंटिकरण झाले व नालीचे बांधकाम झाले आहे.
राहुल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नाकाडोंगरी - तुमसर राज्यमार्ग क्रमांक ३५६ वरील चिचोली येथे गावांतर्गत सिमेंट काँक्रेटचा रस्ता व बाजूला नालीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे वाहतूकीसाठी एकेरी मार्गाचा उपयोग केला जात आहे. मात्र त्या एकेरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचत असल्याने खड्डे किती खोल आहेत याचा अनुमान लागत नसल्याने वाहन खड्ड्यात आपटली जात असून भविष्यात मोठी प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट्यवधी रुपये खर्च करून नाकडोंगरी-तुमसर राज्यमार्गाचे नूतनीकरण करण्याचे काम वर्षभरापासून संथगतीने सुरू आहे. गावांतर्गत सिमेंटीकरण व गावाबाहेर डांबरीकरण असे या कामाचे स्वरूप आहे. राज्यमार्गावरील मेहगाव, मिटेवाणी येथे सिमेंटिकरणाचे काम काही प्रमाणात अधिक झाले आहे. मात्र चिचोली येथे केवळ एका बाजूने सिमेंटिकरण झाले व नालीचे बांधकाम झाले आहे. उर्वरित भागात 'पेव्हर ब्लॉक' चे कामे अजूनही अर्धवट आहे, तर कुठे सिमेंट रस्त्यावर गिट्टी अजूनही तशीच पडली आहे. त्यामुळे चारचाकी, दुचाकी वाहनधारकांना कच्या एकेरी मार्गाचा उपयोग वाहतुकीसाठी करावा लागत आहे. या राज्यमार्गावरून मॅग्निज व रेतीची ओव्हरलोड वाहतूक २४ तास सुरू असते. त्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरुन दोन वाहने जाण्यास मोठी कसरत करावी लागते. परंतु आतापर्यंत सदर बांधकामाच्या कंत्राटदाराने त्या ठिकाणी ना फलक लावले ना कामगार उभे ठेवत आहे. परिणामी बरेचदा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असते. त्यातल्या त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने चाळण झालेल्या रस्त्यात पाणी साचून राहते. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन धारकांना खड्ड्याचा अंदाज बांधता येत नसल्याने दुचाकी व चारचाकी खड्ड्यात आपटते. त्यामुळे वाहन चालकाचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटून मोठा अपघात घडण्याची व मोठी प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदाराने येथे सर्व सुविधेसह वाहतुकीस योग्य रस्ता तयार करण्याची मागणी डॉ. सचिन बावनकर व नागरिकांनी केली आहे.