जिल्ह्यात ४७ हजारांपेक्षा जास्त बांधकाम मजुरांची नाेंदणी आहे, तर नाेंदणी नसलेल्या मजुरांची संख्या ५० हजारांच्या वर आहे. राज्य शासनाच्या घाेषणेप्रमाणे नाेंदणीकृत मजुरांना दीड हजार रुपये मिळणार असले तरी नाेंदणी नसलेल्या बांधकाम मजुरांना कुठल्याही मदतीची घाेषणा करण्यात आली नाही. हे मजूर लाभापासून वंचित राहणार आहेत. दरम्यान, हातावर कमविणे व पानावर खाणे अशी परिस्थिती असलेल्या बांधकाम मजुरांना आर्थिक मदतीची चातकासारखी प्रतीक्षा लागली आहे. शासनाने यावर तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे.
काय म्हणतात बांधकाम मजूर?
काेराेना काळापूर्वी राेज राेजी मिळत हाेती. त्यामुळे कुटुंब चालविण्याची समस्या उद्भवत नव्हती, परंतु संचारबंदीमुळे पुरते हतबल झाले आहाेत. आम्हा मजुरांना दीड हजार रुपयांची मदत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. घाेषणाही झाली आहे. मात्र, मदत अजून मिळाली नाही.
- आकाश माेरे, बांधकाम मजूर
बांधकाम मजुरांसाठी शासनाच्या वतीने दीड हजार रुपये मदतीची घाेषणा करण्यात आली आहे. अजूनपर्यंत खात्यात रक्कम जमा झाली नाही. नाेंदणी करून दाेन वर्षांंचा कालावधी लाेटला आहे. पहिल्यांदाच अशी मदत मिळणार असल्याचे माहीत झाले.
- वंदना ठवकर, महिला कामगार
१५ एप्रिलपासून संचारबंदी घाेषित झाल्यामुळे तेव्हापासून हाताला काम मिळालेले नाही. मदत मिळेल, याची घाेषणा हाेऊन २० दिवसांपासून जास्त कालावधी झाला आहे. हातात जे मजुरीचे पैसे हाेते तेही आता संपले आहे. हातउसणवारी करून संसराचा गाडा ओढत आहे. हे किती दिवस चालणार, असा प्रश्न आमच्यासमाेर निर्माण झाला आहे. लवकर मदत देण्याची गरज आहे.
- रमेश सेलाेकर, बांधकाम कामगार
राज्यशासनाने संचारबंदी केल्यानंतर दीड हजार रुपये देण्यात येईल, असे म्हटले हाेते. मात्र, अजूनपर्यंत मदत खात्यात जमा झाली नाही, परंतु दीड हजार रुपये मिळाले, तरी त्यापासून काय काय विकत घ्यावे, असा प्रश्न निर्माण हाेताे. आधीच विविध समस्या आवासून उभ्या असताना, या संचारबंदीचा आम्हाला चांगलाच फटका बसला आहे.
- महेश कारेमाेरे, बांधकाम कामगार