मोहाडी : कारखान्यातील केमिकलमिश्रित पाणी कालव्यात सोडले जात असून, ते पाणी सरळ शेतात जात असल्याने अनेक शेतकऱ्यांचे रब्बी पीक नष्ट झाले आहे. रसायनयुक्त पाणी त्वरित बंद करण्यात यावे, तसेच शाखा अभियंत्याला निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी मोहाडी तालुका शिवसेनेतर्फे आज, मंगळवारी दुपारी १२ वाजता देव्हाडा येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे.
देव्हाडा बूज येथील मानस साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असून, पूर्ण शक्तीने साखर निर्मिती सुरू आहे. या प्रक्रियेसाठी वापरून झालेले केमिकलयुक्त पाणी ज्यात सल्फर, ॲसिड, गंधक, चुना असतो, असे घाणयुक्त पाणी चोरखमारा नहरात सोडले जात आहे. नहराच्या माध्यमातून हे विषयुक्त निळ्या रंगाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने गहू, हरभरा, लाखोळी, जवस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हिरामण शेंडे यांचा गहू पूर्ण नष्ट झाला आहे.
याबाबत कारखाना प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही नहरात दूषित पाणी सोडणे बंद करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा आयोजित पत्रकार परिषदेद्वारे शिवसेना तालुका प्रमुख अनिल सार्वे, मधुकर बुरडे, गोवर्धन मारवाडे, रूपेश झंझाड, विनोद रहांगडाले यांनी दिला आहे.
बॉक्स
कारखान्याचे पाणी नहरात
कारखान्याचे दूषित पाणी नहरात कोणत्या नियमाद्वारे सोडले जात आहे, ज्यामुळे घनश्याम हिंगे देव्हाडा, मोहगाव (करडी) येथील ज्ञानी बुरडे, आत्माराम पडोळे, मिली गोंडाने, सुशील हिंगे, शालिक उके, आदी शेतकरी केमिकलयुक्त पाण्याने त्रस्त आहेत. त्यांचे संपूर्ण पीक खराब झाले असल्याने कारखाना प्रशासनासोबत चोराखमारा जलाशय विभागाचे शाखा अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.