गत ५ जानेवारीपासून प्रचाराला प्रारंभ झाला होता. गावागावांत या निवडणुकीने वातावरण चांगलेच तापले होते. बुधवार १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता या निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या. मात्र ग्रामीण भागात शेवटच्या रात्रीच खरा प्रचार केला जातो, असा आजवरचा अनुभव आहे. सर्व उमेदवार आणि त्यांचे पाठीराखे गुरुवारच्या रात्री विजयाचे गणित जुळविण्यात मग्न होणार आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मतदानाची संपूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्यातील ४६८ मतदार केंद्रांवर निवडणूक होणार आहे. त्यात तुमसर ५९, मोहाडी ५२, भंडारा १११, पवनी ८२, लाखनी ६८, साकोली ६१ आणि लाखांदूर तालुक्यात ३५ मतदार केंद्रांचा समावेश आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ होणार असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
बॉक्स
ग्रामपंचायत क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीर
ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी शुक्रवार १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानासाठी सार्वजनिक सुटी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जाहीर केली आहे. १५ जानेवारी हा कामकाजाचा दिवस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यातील केवळ सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयांना मतदानासाठी सुटी जाहीर केली आहे.
बॉक्स
तीन दिवस मद्य विक्री बंद
जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे १४ जानेवारी मतदानपूर्वीचा दिवस, १५ जानेवारी मतदानाचा दिवस आणि १८ जानेवारी मतमोजणीचा दिवस या तीनही दिवशी मद्य विक्री बंद राहणार आहे. तीन दिवस सात तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.