जिल्ह्यात १३ हजार नागरिकांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:35 AM2021-03-05T04:35:26+5:302021-03-05T04:35:26+5:30
भंडारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, आतापर्यंत १३ हजार ४०२ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली ...
भंडारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, आतापर्यंत १३ हजार ४०२ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यात ११३३ ज्येष्ठ नागरिकांसह ८३४९ आरोग्य कर्मचारी आणि ६८२१ फ्रंटलाइन वर्करचा समावेश आहे. जिल्ह्याला उद्दिष्टाच्या ८८ टक्के एवढे लसीकरण करण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित असली तरी प्रशासनाच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अंतर्गत लसीकरणाला जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर मिळून १५ हजार १७० असे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत उद्दिष्टाच्या ८८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, तर जिल्ह्यात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील अति जोखमीच्या आजारी रुग्णांना लसीकरणास प्रारंभ झाला आहे. ४५ ते ६० वयोगटात ९० व्यक्तींना तर ६० वर्षांवरील १०३४ नागरिकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, लसीकरणात ऑनलाइनचा बाधा येत आहे. लस घेतल्यानंतर कुणालाही त्रास झाल्याच्या तक्रारी मात्र नाहीत. ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आजार असलेल्या लाभार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून लसीकरण ज्या तालुक्यात करावयाचे आहे त्या तालुक्यातील रुग्णालयात जाऊन लसीकरण करून घ्यावयाचे आहे. ऑनस्पाॅट रजिस्ट्रेशनही करता येणार आहे.
कोरोना लस घेण्यासाठी केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. नागरिकांनी गर्दी न करता वेळेचे नियोजन करून लसीकरणासाठी उपस्थित राहावे. सकाळी ९ ते सायंकाळी ४.४५ वाजेपर्यंत लसीकरणाची वेळ आहे. दुपारच्या वेळी तुलनेत कमी नागरिक येतात. नागरिकांनी गर्दी न करता वेळेचे नियोजन केल्यास लसीकरण सुकर होईल.
-संदीप कदम, जिल्हाधिकारी