कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.ग्रामीण भागातही रुग्ण झपाट्याने वाढत आहे.
घरोघरी रुग्ण मिळत आहे. ताप, खोकला, बेचव, अशक्तपणा अशी लक्षणे असणारे रुग्ण यांना डॉक्टर कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला देतात. प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे दररोज १०० ते १५० लोकांच्या अँटिजन टेस्ट करून लोकांना त्यांचे रिपोर्ट दिले जात आहे, असे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल बोरकर यांनी सांगितले. नागरिकांनी कोरोना विषयी भीती न बाळगता, प्राथमिक लक्षणे म्हणजे ताप, खोकला, अशक्तपणा, तोंडाला चव नसल्यास स्वतः समोर येऊन कोरोना टेस्ट करून घेणे सोयीचे आहे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास घाबरून न जाता उपचार करावे व स्वतः १४ दिवस अलग राहावे. आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे सध्या कोरोना लसीकरणचा दुसरा डोस नागरिकांना दिला जात आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, पण वयोवृद्ध व ४५ते ५९ वयांतील नागरिक पहिली लस घेण्यासाठी गेले असता लस उपलब्ध नाही, असे सांगितले जाते आहे. सध्या भंडारा जिल्ह्यातील १६६ केंद्रांवर लस उपलब्ध नाही. गेल्या पाच दिवसांपासून लसीचा तुटवडा आहे. कोंढा केंद्रावरही लस तुटवडा आहे. लसीकरण डोस जिल्हा परिषद आरोग्य विभाग पुरवठा करतो. केंद्र सरकार सर्वत्र राज्यांना लस वाटप करीत असते, पुरवठा योग्य न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. ग्रामीण जनतेला कोरोना लसीचा साठा प्रथम उपलब्ध करून नियमित लसीकरण सुरू करण्याची मागणी येथील सर्व नागरिकांनी केली आहे.