आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात दिसणार भंडाऱ्याचा 'हौसला और रास्ते'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:15 PM2018-10-26T13:15:09+5:302018-10-26T13:15:48+5:30
भंडारा जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घेऊन विविध राज्यातील कलावंतांना घेऊन तयार केलेला 'हौसला और रास्ते' या लघुचित्रपटाची दिल्ली येथे होऊ घातलेल्या सातव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लघु-चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली असून २८ आॅक्टोबरला त्याचे प्रदर्शन होणार आहे.
देवानंद नंदेश्वर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घेऊन विविध राज्यातील कलावंतांना घेऊन तयार केलेला 'हौसला और रास्ते' या लघुचित्रपटाची दिल्ली येथे होऊ घातलेल्या सातव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लघु-चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली असून २८ आॅक्टोबरला त्याचे प्रदर्शन होणार आहे. जगभरातील विविध ठिकाणचे चित्रपट या महोत्सवात दाखवले जातील. त्याचबरोबर जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवात देखील हा लघुचित्रपट दाखवला जाणार आहे.
या लघुचित्रपटात गुजरातमधील अभिनेता मौलिक चव्हाण आणि नागपूर येथील हिमांशी कावळे, औरंगाबादचे सुरेश जोशी प्रमुख भुमिकेत आहेत. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यातील लाखनीतील प्रसिद्ध नाट्यकलाकार संजयराव वनवे, उद्योजक अतुल पाटील भांडारकर, अंजली भांडारकर, तुमसर येथील सरोजलता बर्वे, स्वप्निल जांगळे या कलावंतांनीदेखील या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.
नुकतेच या चित्रपटाचे 'ट्रेलर' रिलीज झाले असून यू ट्यूब आणि सोशल मिडियावर त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मुंबईस्थित प्रशांत चव्हाण यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी' तसेच संगीत दिग्दर्शन देखील केले आहे. गुजरात येथील अक्षित रोहडा यांनी सहाय्यक सिनमॅटोग्राफर म्हणून भूमिका निभावली आहे. इमरान शेख या चित्रपटाचे इन्स्ट्रक्टर तर व्यंकट भोंडेकर यांनी लाईटमॅनची भूमिका पार पाडली आहे.निर्माते चेतन भैरम असून सहनिर्माता प्रशांत वाघाये आणि कार्यकारी निर्माता योगेश भोंडेकर आहेत. मुळचे तुमसरचे असलेले सध्या मेड्रिड (स्पेन) येथे राहत असलेले रोशन भोंडेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
दिल्ली येथे होत असलेल्या चित्रपट महोत्सवास चेतन भैरम, प्रशांत वाघाये, इमरान शेख, योगेश भोंडेकर, अतुल भांडारकर यांची उपस्थिती लागणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन भंडारा येथे होत आहे.
विदर्भात कलाकारांची कमी नाही. 'हौसला और रास्ते' च्या माध्यमातून त्यांच्या कलेला वाव मिळावा आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यासह चित्रपट क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा, या दृष्टीने केलेला हा प्रयत्न आहे. त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
रोशन भोंडेकर, दिग्दर्शक तथा पटकथा लेखक