सेतू अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा दैनिक सहभाग आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:24 AM2021-07-02T04:24:40+5:302021-07-02T04:24:40+5:30
वाकेश्वर : कोरोनाकाळातील विपरित परिस्थितीमध्ये मुलांच्या शिक्षणात बाधा निर्माण झाली होती. मुलांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने ...
वाकेश्वर : कोरोनाकाळातील विपरित परिस्थितीमध्ये मुलांच्या शिक्षणात बाधा निर्माण झाली होती. मुलांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने शिक्षकांनी सोय केली होती. शेवटी या सत्रात शाळेत दाखल सर्व मुलांची वर्गोन्नती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या त्यात्या वर्गाच्या विषयनिहाय क्षमता संपादित झाल्या नसतील, असे गृहीत धरून राज्यस्तरावरूनच क्षमता संपादित करण्यासाठी सेतू अभ्यासक्रमाची अर्थात ब्रिज कोर्सची रचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाला आता सर्वच शाळांमधून प्रारंभ झाला आहे.
या ब्रिज कोर्सची माहिती देण्यात आली आहे. १ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत या सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करावयाची आहे. या ४५ दिवसांच्या अभ्यासक्रमादरम्यान तीन चाचण्या घेण्यात येणार असून हा सेतू अभ्यासक्रम व्यवस्थापनाच्या मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी व वर्ग २ ते १० वीसाठी हा अभ्यासक्रम लागू राहील. तसेच हा अभ्यासक्रम दैनंदिन स्वरूपाचा असणार आहे.
या सेतू अभ्यासक्रमामध्ये मुलांना स्वयंअध्ययन करण्यास मदत करेल, अशा प्रकारच्या दैनंदिन कृतीपत्रिकेचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थी सेतू अभ्यासक्रमातील कृतीपत्रिका सोडवण्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी मित्र यांचीही मदत घेतील. या विषयनिहाय कृतीपत्रिका विद्यार्थ्यांनी स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहेत. तसेच ४५ दिवसांच्या या अभ्यासक्रमात तीन चाचण्या घेऊन त्यांचे गुणांकन शिक्षकांनी आपल्याकडे नोंदवून ठेवायचे आहे. सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नियमित अभ्यासक्रम अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू करायची आहे.
भंडारा शहरातील सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापकांना आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना संकेतस्थळावरून अभ्यासक्रम डाउनलोड करावयाचा आहे. या अभ्यासक्रमाबाबत राज्यस्तरावरून दैनंदिन आढावा घेण्यात येणार असल्याने सेतू अभ्यासक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा दैनिक सहभाग अपेक्षित राहणार आहे.