लाखनीः तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस, वादळी वारा, गारपिटीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल कृषी विभागाने दिला आहे. लाखनी तालुक्यात अवकाळी पावसामुळे एकूण ६२ गावे बाधित झाली आहेत. तालुक्यात ३,१८४ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान रोवणी करण्यात आली होती. यासोबतच मूग २७. ९५ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली तर भाजीपाल्याची लागवड २५७.४५ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. तालुक्यातील लाखनी, पोहरा, मुरमाडी (तुपकर), पालांदुर (चौ.), पिंपळगाव (सडक) येथील कृषी मंडळ कार्यालयाअंतर्गत उन्हाळी धानाचे ८३५.७० हेक्टर आहे. त्यापैकी ३३ टक्केच्या आत पिकाचे नुकसान असलेले क्षेत्र ४०७. ८० हेक्टर आहे तर ३३ टक्केच्या वर पिकाचे नुकसान असलेले क्षेत्र ४२७. ९० हेक्टर आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या १,०४३ इतकी आहे. भाजीपाल्याचे नुकसान झालेले क्षेत्र ११.१० हेक्टर आहे. त्यात ३३ टक्केच्या वर नुकसान झालेले क्षेत्र १०.७० हेक्टर आहे. २२ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागामार्फत व्यक्त करण्यात आला आहे. तालुक्यातील ६ मूग उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने आकडेवारीनुसार नुकसानीचे प्रमाणानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. पावसामध्ये धान पीक भिजल्याने व धानाच्या लोंबा गळून पडल्याने नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे धान कापणीस उशीर होत आहे तर अनेक शेतकऱ्यांनी खरीप पूर्व मशागतीला प्रारंभ केला आहे.
कोट
उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला आहे. अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळणार नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे.
अशोक पटले, उपाध्यक्ष, काँग्रेस ओबीसी सेल, मासलमेटा