प्रकरण इंजेवाडा येथील : वन विभागावर संशयाची सुई भंडारा : तालुक्यातील इंजेवाडा शेतशिवारात संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळून आलेल्या चितळाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर जमिनीत पुरले. ही बाब वरिष्ठांपर्यंत गेल्याने वन कर्मचाऱ्यांनी पुरलेला चितळ बाहेर काढून त्याच्या मृतदेहावर कोका रेस्ट हाऊसमध्ये अग्निसंस्कार केले. चितळाचा मृत्यू विजेच्या करंटमुळे झाल्याची चर्चा असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोका वनक्षेत्रांतर्गत इंजेवाडा येथील शेतशिवारात दि. १४ फेबु्रवारीच्या मध्यरात्री मादा चितळाचा संशयास्पद मृत्यू झाला. १५ फेबु्रवारी रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, हे प्रकरण येथेच संपविण्यासाठी संबंधित शेतकरी व वन कर्मचाऱ्यांनी संगनमत करून त्या चितळाला त्याच शेतात पुरले. शेतात खड्डा करण्यासाठी कोका रेस्ट हाऊसवरून वनमजुरांना बोलविण्यात आले होते. वनमजुरांच्या हातानेच त्याला पुरण्यात आले. त्यावेळी शेतशिवारात विजेच्या तारा लावल्या होत्या. दरम्यान, या घटनेची कुणकुण गावात लागल्यानंतर चर्चा होऊ लागली. काहींनी याची तक्रार वरिष्ठांकडे केल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी १६ फेबु्रवारीला शेतात पुरलेला चितळाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर एका ट्रॅक्टरमध्ये घालून त्याला कोका रेस्ट हाऊसमध्ये आणण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले नाही, अशी माहिती आहे. तथापि, या प्रकरणाची चौकशीची मागणी होत आहे. यासंदर्भात पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. केणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी टोलवाटोलवीचे उत्तर दिले. त्यानंतर अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (नगर प्रतिनिधी)इंजेवाडा शेतशिवारात चितळ मृतावस्थेत आढळून आल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात आली. चितळाचा मृत्यू नैसर्गिक आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करण्यात आले. -वसीम खान, क्षेत्र सहाय्यक, कोका.
शवविच्छेदन न करता पुरले चितळाला!
By admin | Published: February 19, 2017 12:20 AM