ऊस तोडणीपूर्वी आग लावल्याने उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:04 AM2021-03-13T05:04:11+5:302021-03-13T05:04:11+5:30
सिहोरा परिसरात असणाऱ्या वैनगंगा, बावणथडी नद्याचे खोऱ्यात नगदी पीक म्हणून शेतकरी ऊस लागवड करीत आहेत. उसाचे उत्पादन घेताना वन्यप्राणी ...
सिहोरा परिसरात असणाऱ्या वैनगंगा, बावणथडी नद्याचे खोऱ्यात नगदी पीक म्हणून शेतकरी ऊस लागवड करीत आहेत. उसाचे उत्पादन घेताना वन्यप्राणी शेतकऱ्यांचे लचके तोडत आहेत. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने उसाचे नुकसान होत आहे. ऊस उत्पादनातून आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र ऊस तोडणीत शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत आहे. ऊस तोडताना आधी आगीच्या हवाली करण्यात येत असल्याने निश्चितच उत्पादनात घट होत आहे. गाळप करताना घट होत असल्याने भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे.
साखर कारखान्यात उसाची खरेदी करताना ही अट घातली गेली असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे ऊस तोडणारे मजूर कामे करीत नाहीत. आधी ऊस जाळल्यानंतर कापणी केली जात आहेत. या उसाची उचल करण्यात येत आहे. मोजमाप करताना यात घट होत आहे. यामुळे उसाची शेती परवडणारी नाही, असा समज शेतकऱ्यांत निर्माण झाला आहे. ऊस जाळण्याची पद्धत बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश सोनेवाणे यांनी केली आहे.