सदोष आवास प्लस मोबाइल ॲप सर्वेक्षणाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:47 AM2021-02-27T04:47:14+5:302021-02-27T04:47:14+5:30
लाखांदूर : दोन वर्षांपूर्वी शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रपत्र ‘ड’ यादीनुसार गरजू व पात्र लाभार्थ्यांचे आवास प्लस मोबाइल ॲपच्या ...
लाखांदूर : दोन वर्षांपूर्वी शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रपत्र ‘ड’ यादीनुसार गरजू व पात्र लाभार्थ्यांचे आवास प्लस मोबाइल ॲपच्या माध्यमातून झालेले सर्वेक्षण सदोष असल्याचा आरोप होत असून, ग्रामसभेने निवडलेल्या यादीनुसार लाभ देण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी लाखांदूर तालुका सरपंच संघटनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील गरजू व पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रपत्र ‘ब’ व ‘ड’नुसार निवड यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार प्रपत्र ‘ब’मधील सर्वच लाभार्थ्यांना यंदा घरकुलाचा लाभ मंजूर करण्यात आल्याने पुढील काळात प्रपत्र ‘ड’मधील लाभार्थ्यांना घरकूल मंजूर केले जाण्याची शक्यता आहे.
ही बाब लक्षात घेता गत दोन वर्षांपूर्वी शासनाने आवास प्लस मोबाइल ॲप सर्वेक्षण करून प्रपत्र ‘ड’ अंतर्गत लाभार्थ्यांची निवड केली होती. मात्र सदर निवड होताना मोबाइल ॲपमध्ये तालुक्यातील अनेक पात्र व गरजू लाभार्थ्यांची नावे समाविष्ट नसल्याची ओरड आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविताना सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष जितेंद्र पारधी, महासचिव अरुण गभने, उपाध्यक्षा मंगला शेंडे, होमराज ठाकरे, सुमेध रामटेके, प्रमोद प्रधान, ज्योती रामटेके, सुनीता बावने, शैलेश रामटेके, अमृत मदनकर, सविता लेदे, संगीता धनविजय आदी उपस्थित होते.