मागणी 40 लाख बारदाना नगाची, जिल्ह्याला मिळाले केवळ दहा लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 05:00 AM2021-06-30T05:00:00+5:302021-06-30T05:00:17+5:30
गाेदामाच्या अभावी धानखरेदीला उशीर झाला. भरडाईसाठी धान मिलर्सने वेळेत उचलला नाही परिणामी गाेदाम फुल्ल हाेते. रबीतील धान काेठे ठेवावा? असा प्रश्न हाेता. शेवटी यावर ताेडगा काढत बंद असलेल्या शाळा धान साठविण्यासाठी घेण्याचा निर्णय झाला. अखेर १८ मेपासून जिल्ह्यात धानखरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यात १३८ आधारभूत केंद्रांना मंजुरी मिळाली. त्यापैकी १३३ केंद्राचे उद्घाटन झाले. तर प्रत्यक्षात १२९ केंद्रावर धानखरेदी झाली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सुरुवातीला भरडाईसाठी धानाची उचल न झाल्याने गाेदामाचा प्रश्न आणि आता खरेदी झालेले धान भरण्यासाठी बारदान्याचा अभाव असे शुक्लकाष्ठ यंदा रबी हंगामातील धानखरेदीचा मागे लागले आहे. सुरुवातीपासूनच अडचणीत आलेली धानखरेदी अंतिम टप्यात असताना आता बहुतांश केंद्रावर बारदानच नाही. पणन महासंघाने ४० लाख बारदान नगाची मागणी केली. परंतु जिल्ह्याला केवळ दहा लाख बारदाना नग प्राप्त झाले. त्यामुळे अनेक केंद्रांवरील धानखरेदी आता ठप्प झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात दरवर्षी १ मेपासून धानखरेदीला प्रारंभ हाेताे. परंतु गाेदामाच्या अभावी धानखरेदीला उशीर झाला. भरडाईसाठी धान मिलर्सने वेळेत उचलला नाही परिणामी गाेदाम फुल्ल हाेते. रबीतील धान काेठे ठेवावा? असा प्रश्न हाेता. शेवटी यावर ताेडगा काढत बंद असलेल्या शाळा धान साठविण्यासाठी घेण्याचा निर्णय झाला. अखेर १८ मेपासून जिल्ह्यात धानखरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यात १३८ आधारभूत केंद्रांना मंजुरी मिळाली. त्यापैकी १३३ केंद्राचे उद्घाटन झाले. तर प्रत्यक्षात १२९ केंद्रावर धानखरेदी झाली. २८ जूनपर्यंत २० हजार १५४ शेतकऱ्यांनी ८ लाख ७७ हजार ४४५ क्विंटल धानाची विक्री केली. मात्र आता बारदानांचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावर बारदानांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
यावर ताेडगा काढण्यासाठी जिल्हा पणन कार्यालयाने संबंधितांकडे ४० लाख बारदान नगाची मागणी केली. मात्र जिल्ह्याला आतापर्यंत केवळ १० लाख नग बारदान प्राप्त झाले आहे. अद्यापही धानखरेदी सुरू आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार १४ लाख क्विंटल धानाचे उत्पन्न अपेक्षित आहे. ऐवढा धान साठविण्यासाठी माेठ्या प्रमाणात बारदान्याची गरज आहे. परंतु जिल्ह्याला केवळ १० लाख बारदान मिळाल्याने धानखरेदी प्रभावित झाली आहे. बारदाना नसल्याने अनेक केंद्र चालकांपुढे खरेदीचा प्रश्न आहे.
२० हजार शेतकऱ्यांनी विकला धान
- रबी हंगामात जिल्ह्यातील २० हजार १५४ शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीनुसार धान विकला आहे. पणन महासंघाने ८ लाख ७७ हजार ४४५ क्विंटल धान खरेदी केला आहे. भंडारा तालुक्यात ५५ हजार २३६ क्विंटल, माेहाडी तालुक्यात १ लाख ५५ हजार ८२० क्विंटल, तुमसर तालुक्यात दोन लाख ४७ हजार ५४९, लाखनी तालुक्यात ६६ हजार ८६ क्विंटल, साकाेली तालुक्यात एक लाख १९ हजार ७७८ क्विंटल, लाखांदूर तालुक्यात एक लाख ३६ हजार ९३४ क्विंटल आणि पवनी तालुक्यात ७६ हजार ३९ असा आठ लाख ७७ हजार ४४५ क्विंटल धानखरेदी करण्यात आला आहे.
धानखरेदीचा आज शेवटचा दिवस
आधारभूत धानखरेदी करण्याचा ३० जून हा शेवटचा दिवस आहे. मात्र यंदा उशिराने खरेदी सुरू झाल्याने आधारभूत खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करीत आहे. आतापर्यंत निम्माच धान खरेदी झाला आहे. त्यामुळे एक महिना मुदतवाढ देण्याची गरज आहे. मुदत वाढ मिळाली नाही तर शेतकऱ्यांना आपला धान व्यापाऱ्यांना विकावा लागेल. त्यात त्यांची आर्थिक पिळवणूक हाेणार आहे.