मुखरू बागडे
भंडारा : कोरोनानंतर प्रथमच ग्रामीण अर्थव्यवस्था मोकळी झालेली आहे. गावागावातील ये-जा करताना निर्बंध हटविले आहेत. दसरा-दिवाळीच्या पर्वात साफसफाई करिता हस्तकलेच्या झाडूला बऱ्यापैकी मागणी वाढलेली आहे. रिकाम्या हातांना काम मिळाले असून गरजूंनी सुद्धा हस्तकलेच्या वस्तूंना (झाडुंना) खरेदी करीत दिवाळीचा उत्सव पार पडावा.
हस्तकला मनुष्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण कला आहे. कलेला वाव मिळाल्यास जीवन निश्चितच प्रेरणादायी ठरते. ग्रामीण भागात शिंदीच्या झाडाच्या पानांपासून विविध वस्तू बनविल्या जातात. घरातील शोभेच्या वस्तूंपासून तर, साफसफाई उपयोगी झाडू बनवण्यापर्यंत या पानांचा वापर केला जातो. या झाडुंचा वापर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केल्या जातो.
पालांदूर परिसरात शिंदीच्या झाडांची मुबलकता आहे. त्यांच्या फांद्या तोडून, सुकवून त्यापासून स्वच्छतेत, साफसफाई करिता दररोज कामी येणारे झाडू तयार होतात. एक झाडू किमान २० ते ३० रुपये किमतीचा आहे. दुकानातील किमतीपेक्षा अर्ध्या किमतीत तेही घरपोच मिळतात.
सततच्या दोन वर्षाच्या कोरोना संकटात कित्येक कुटुंब निराश्रित झालेले आहेत. आर्थिक विवंचना संकट बनले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे. हस्तकला व इतर कलांना कोरोना संकटात सुमार संकटांचा सामना करावा लागला. बऱ्याच कुटुंबात खाण्याचे वांदे सुद्धा तयार झाले होते. शासनाने शक्य ते प्रयत्न करीत गरिबांना सहकार्य केले खरे, परंतु अर्थव्यवस्थेला गती देऊ शकले नाही. त्यामुळे दिवाळी गरिबांना पार पडताना खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. तेव्हा 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या नात्याने आपल्याच भागातील हस्तकलेच्या आधाराने तयार केलेले वस्तूंना /झाडू खरेदी करीत सहकार्य केल्यास गरीबांना निश्चितच आधार मिळेल हे विशेष!