पाटबंधारे विभागातील बोगस कामाची चौकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:34 AM2021-04-15T04:34:14+5:302021-04-15T04:34:14+5:30
निवेदनानुसार भंडारा येथे कार्यरत उपअभियंता बाभरे, तुमसर व साकोली यांनी नियमाला व शासननिर्णयाला न अनुसरून बांधकामाची कामे केली आहेत. ...
निवेदनानुसार भंडारा येथे कार्यरत उपअभियंता बाभरे, तुमसर व साकोली यांनी नियमाला व शासननिर्णयाला न अनुसरून बांधकामाची कामे केली आहेत. त्यांचे कार्यकाळात कामे मंजूर नसतानासुद्धा कामे त्यांच्या जवळील कंत्राटदारांना वाटप केले.
सदर कामांची जाहिरात नाही. अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाची परवानगी घेतलेली नाही. शासनाच्या संकेतस्थळावर शासननिर्णयाप्रमाणे निविदा अपलोड केली नाही. सर्व मोठ्या कामांचे तुकडे करून अंदाजपत्रक तीन लाखांचे तयार करण्यात आले. नोटीस बोर्डवर निविदेची नोटीस लावण्यात आली नाही. सदर प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संबंधितांचे वेतन व निवृत्ती वेतन थांबविण्यात यावे. तसेच त्यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कामांचे छायाचित्रीकरण व मोक्का निरीक्षण करून बोगस कामांची चौकशी करण्यात यावी.
संपूर्ण कामांचा निधी विदर्भ पाटबंधारे विभाग महामंडळ, नागपूर यांच्याकडून प्राप्त होतो. त्यामुळे त्यांनी सर्व कामांची देयके थांबविण्यात यावी, अन्यथा सदर प्रकरणाला कार्यकारी संचालक जबाबदार राहतील असे निवेदनात नमूद केले आहे.
या प्रकरणाची माहिती माहिती अधिकाराअंतर्गत नियमानुसार मागितल्यावरही मागील दोन महिन्यापासून माहिती संबंधित कार्यालय देत नाही. उलट सदर कार्यालय बोगस कामे झाल्याचा पुरावा मागत आहे हे विशेष. यामुळे माहिती अधिकाराच्या कायद्याचे उल्लंघन होत असून या सदर्भात राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.