उच्चस्तरीय समितीसमोर अग्निकांडाचे प्रात्यक्षिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 05:47 AM2021-01-13T05:47:44+5:302021-01-13T05:48:04+5:30
त्या रात्री बचाव कार्य कसे केले, हे पथकासमोर करून दाखविले. तसेच डॉक्टर, नर्स, सुरक्षा रक्षक यांच्याकडूनही समितीने माहिती घेतली.
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीची घटना नेमकी कशी घडली, याचे प्रात्यक्षिक त्या रात्री बचाव कार्यात सहभागी अग्निशमन कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, गार्ड यांच्याकडून अग्निकांडाच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने मंगळवारी करवून घेतले. विभागीय आयुक्त संजीवकुमार यांच्या नेतृत्वातील ही समिती भंडाऱ्यात डेरेदाखल झाली आहे. याच समितीच्या अहवालावर या अग्निकांडाचे खरे गुन्हेगार कोण, हे पुढे येणार आहे. पथकाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्या कक्षात बसून सुरुवातीला बंदद्वार चर्चा केली. त्यानंतर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर रुग्णालय परिसराची बाहेरून व आतून पाहणी केली. बचाव कार्यात सहभागी असलेल्यांकडून तसेच नगर परिषदेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. अग्निशमन दल वाहनासह रुग्णालयात उपस्थित झाले होते. त्यांनी त्या रात्री बचाव कार्य कसे केले, हे पथकासमोर करून दाखविले. तसेच डॉक्टर, नर्स, सुरक्षा रक्षक यांच्याकडूनही समितीने माहिती घेतली.
या पथकात सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एम., महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसचे संचालक प्रभात रहांगडाले, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे आणि आरोग्य सेवा उपसंचालक संजय जयस्वाल यांचा सहभाग आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. समिती भंडारा अग्निकांडाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत भंडाऱ्यात डेरेदाखल राहणार आहे.