तालुक्यातील पशुपालक जनावरांच्या गोठ्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:38 AM2021-08-26T04:38:07+5:302021-08-26T04:38:07+5:30
पंचायत समितीअंतर्गत तालुक्यातील गरजू लोकांना गायी व म्हशी देण्यात आल्या आहेत. मात्र, ज्यांना गोठ्यांची गरज आहे, अशा लाभार्थ्यांना गोठा ...
पंचायत समितीअंतर्गत तालुक्यातील गरजू लोकांना गायी व म्हशी देण्यात आल्या आहेत. मात्र, ज्यांना गोठ्यांची गरज आहे, अशा लाभार्थ्यांना गोठा न मिळता ज्यांच्याकडे पूर्वीचे गोठे आहेत, त्या सधन लाभार्थ्यांना जनावरांचे गोठे देण्यात आले आहेत. मागील १०-१२ वर्षांपासून सौंदड येथील लता राजकुमार ठाकरे यांच्याकडे ५ म्हशी व १५ शेळ्या आहेत. त्यांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा गोठ्याची मागणी केली. पण त्यांना आजही गोठा मंजूर करण्यात आला नाही. लता ठाकरे यांच्याकडे आधी १० म्हशी होत्या. पण, गोठा नसल्याने त्यांना ५ म्हशी विकाव्या लागल्या. आजघडीला त्यांच्याकडे ५ म्हशी व १५ शेळ्या असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मोडक्या व जीर्ण अवस्थेतील घरात त्यांना राहावे लागत आहे.
घर बांधण्याची परिस्थिती नाही, तर जनावरांसाठी गोठा कोठून बांधणार, असा प्रश्न त्यांनी केली. १० वर्षांपासून घरासमोर अंगणात मांडव टाकून त्या म्हशी व शेळ्या बांधतात. शासन अशा गरजू लोकांना गोठा मंजूर न करता पुढाऱ्यांच्या जवळील सधन कार्यकर्त्यांना गोठा मंजूर करवून घेतात. गावात सर्वेक्षण करून गरजूंना योजना द्यायला पाहिजे होती, मात्र तसे होत नसल्याची ओरड आहे.
शेती नसल्याने बँक कर्ज देत नाही. २० वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. त्यावेळेस वडिलांनी म्हैस दिली होती. त्या एका म्हशीवरून प्रत्येक वर्षी म्हैस घेऊन सन २०१६ मध्ये माझ्याकडे १० म्हशी होत्या. पण, घरी गोठा नसल्याने दरवर्षी एक-एक म्हैस विकावी लागली. आजघडीला ५ म्हशी व १५ शेळ्या आहेत. शेळ्या व म्हशी मांडवात बांधत आहे. सन २०२०मध्ये पशुसंवर्धन विभागाने पशु मेळावा आयोजित केला. त्यात उत्कृष्ट पशुपालक म्हणून स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पण, मागील १० वर्षांपासून गोठ्याची मागणी करूनसुद्धा गोठा मंजूर करण्यात आला नाही.
-लता ठाकरे, पशुपालक, सौंदड