दीड वर्षापासून हमाल मजुरीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:33 AM2021-03-08T04:33:14+5:302021-03-08T04:33:14+5:30
: जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार लाखांदूर : खरेदी विक्री सह. संस्थेंतर्गत गत काही वर्षांपासून हंगामी सुरू असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत ...
: जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार
लाखांदूर : खरेदी विक्री सह. संस्थेंतर्गत गत काही वर्षांपासून हंगामी सुरू असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत हमाली काम करणारे हमाल तब्बल दीड वर्षापासून मजुरीपासून वंचित असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार तालुक्यातील दिघोरी/मोठी येथील शासकीय धान खरेदी केंद्रावरील हमालांनी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक चिमनकर यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तालुक्यातील दिघोरी/मोठी येथे स्थानिक लाखांदूर येथील दि. खरेदी विक्री सह. संस्था अंतर्गत गत काही वर्षांपासून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र चालविले जात आहे. या केंद्रांतर्गत सन २०१९-२० या कालावधीत खरीप व उन्हाळी या दोन्ही हंगामात धान खरेदी करण्यात आली. ही खरेदी होताना या केंद्रावर दिघोरी/मोठी येथील तब्बल ३० मजूर हमाली कामावर कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.
त्यानुसार २०१९-२० या वर्षीच्या खरिपातील हमाली अंतर्गत जवळपास ५० हजार रुपये मजुरी थकीत असल्याचे म्हटले आहे. तथापि, उन्हाळी हंगामात एकूण ८००६ क्विंटल खरेदी पूर्ण झाली असताना या खरेदी अंतर्गतदेखील एकही रुपयाची हमाली देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर सद्या या केंद्रांतर्गत यंदाच्या खरिपातील धानाची खरेदी सुरू आहे.
ही खरेदी येत्या काही दिवसांनी पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, सदर केंद्रांतर्गत हमाली काम होऊन तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ लोटूनदेखील मजुरी देण्यात आली नसल्याची ओरड आहे. या संबंधी गैरव्यवहारामुळे हामाली करणाऱ्या मजुरांवर उपासमारीचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन थकीत हमालीसह यंदाच्या खरिपातील हमाली देण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक चिमनकर यांच्या नेतृत्वात तक्रारकर्त्या हमालांमध्ये कृष्णा देशमुख, सहदेव आगासे, सखाराम सलामे, मन्साराम देशमुख, यशवंत अवचट, शामराव बावनकुळे, आशिक भलावी, सोविन्दा मस्के, नीलकंठ देशमुख, रमेश राऊत, रामदास कांबळे यासह अन्य २० हमाल, मजुरांचा समावेश आहे.