भाविका म्हणतात, उघड दार देवा आता उघड दार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:38 AM2021-08-27T04:38:23+5:302021-08-27T04:38:23+5:30
चुल्हाड (सिहोरा) : कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमध्ये बंद असलेले चांदपूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर अद्यापही बंदच आहे. देवस्थानातील कर्मचारी, ...
चुल्हाड (सिहोरा) : कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमध्ये बंद असलेले चांदपूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर अद्यापही बंदच आहे. देवस्थानातील कर्मचारी, व्यावसायिक अडचणीत आले आहेत. भाविक दुरूनच आराध्य दैवताचे दर्शन घेत असून लंगडा हनुमान मंदिरात पूजा अर्चना करून घराची वाट धरत आहेत. जिल्ह्यात कोरानेाची स्थिती सर्वसामान्य झाली असतानाही मंदिर बंद असल्याने भाविकांना उघड दार देवा, उघड दार अशीच हाक भाविक देत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. प्रादुर्भाव ओसरताच अनलॉक प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सर्व सामान्य जीवन रुळावर आणण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु देवस्थान, मंदिरे बंदच आहेत. चांदपूरचे जागृत हनुमान देवस्थान कुलूपबंद आहे. देवस्थान बंद होताच व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. देवस्थानातील कर्मचाऱ्यांना कपातीचा सामना करावा लागला आहे. अनेकांनी रोजगारासाठी नागपूरची वाट धरली आहे. मुख्य रस्ताच बंद करण्यात आला आहे. रस्त्याचे आत व्यावसायिकांचे दुकाने बंदिस्त झाले आहेत. दुकाने उघडण्याची कुणालाही परवानगी नाही. दुकाने बंद असल्याने रोजीरोटीचे संकट व्यावसायिकांवर आले आहे. या व्यावसायिकांना ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाने तारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोबतीला भाविक आराध्यदैवताचे दुरूनच दर्शन घेण्यासाठी येत आहेत. पूजा-अर्चनाचे साहित्य खरेदी विक्रीचे दुकाने देवस्थान बाह्य रस्त्यावर थाटण्यात आली आहे. अर्धा किमी अंतरावर असणाऱ्या लंगडा हनुमान देवस्थानात पूजा अर्चना करून भाविक घरचा रस्ता धरत आहेत. यामुळे काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले आहे. परंतु निम्म्याहून अधिक व्यावसायिक रोजगारासाठी बाहेर पडले आहे. दुकाने व देवस्थान कधी उघडणार याची विचारणा करीत आहे.
बॉक्स
गावातील व्यवसाय ठप्प
देवस्थान व पर्यटन विकास कार्यावर गावातील व्यवसाय आहे. भाविक भक्त आणि पर्यटकांची वाढती गर्दी व्यवसायाला चालना देणारी आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारी आहे. परंतु गर्दीवर ब्रेक लावण्यात आल्याने सारेच व्यवसाय चौपट झाले आहेत. किराणा, पान टपऱ्या, फुल व अन्य व्यवसाय कुलूपबंद झाले आहेत. नागरिकांची समाधानकारक रेलचेल नसल्याने व्यावसायिक झाले आहे. रोजगार शोधणारे हात रिकामे झाले आहेत. सरकारच्या पत्राची रोजच प्रतीक्षा गावकऱ्यांना करावी लागत आहे. परंतु पत्रच निघत नाही. देवस्थान सुरू करण्याचे अपेक्षा वाढल्या आहेत.
कोट
देवस्थानाचे बाबतीत सकारात्मक निर्णय शासनाने घेतले पाहिजे. ग्रीन व्हॅली चांदपूर देवस्थानाला संजीवनी देण्याची गरज आहे. व्यावसायिकाचे दुकाने बंद असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-उर्मिला लांजे, सरपंच चांदपूर