करडी(पालोरा): ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल १८ जानेवारीला जाहीर झाला. तेव्हापासून भावी सरपंचांचे आरक्षणाकडे लक्ष लागले होते. ५ फेब्रुवारीला आरक्षण सोडत काढण्यात आली. तालुक्याच्या ठिकाणी आरक्षण सोडत पाहण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. भावी सरपंचाची आस असलेल्या अनेकांनी आरक्षण अनुकूल दिसून येताच आनंद व्यक्त केला. गावागावांत माहिती दिली. तर काहींनी प्रतिकूल दिसताच संताप व्यक्त केल्याचे चित्र दिसून आले.
आरक्षणामुळे अनेक गावांतील भावी सरपंचांना ठेच पोहोचली. काही ठिकाणी महिलाराज आल्याने तर काही ठिकाणी अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण आल्याने भंबेरी उडाली. काही ठिकाणी एकाच गटाचे बहुमत असताना आरक्षण प्रतिकूल तर, विरोधकांसाठी अनुकूल आल्याने गर्दीतून वेळीच काढता पाय घेतला. आरक्षणामुळे अनेकांचे स्वप्न भंगले, तर काहींनी अचानक लॉटरी लागल्याचा आनंद व्यक्त केला.
गटग्रामपंचायत जांभोरा येथे यादोराव मुंगमोडे यांच्या गटाला ११ पैकी ७ जागा मिळाल्या, तर माजी सरपंच भुपेंद्र पवनकर यांच्या गटाला केवळ चार जागा मिळाल्या. परंतु, सरपंचाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलेचे असल्याने यादोराव मुंगमोडे यांना मोठा धक्का बसला. भुपेंद्र पवनकर यांच्या गटाने आनंद व्यक्त करीत गावातून जल्लोषात मिरवणूक काढली. एक महिला असल्याने सरपंचाची निवड बिनविरोध होण्याची शक्यता असून यादोराव मुंगमोडे यांचे सरपंच होण्याचे स्वप्न भंगले आहे. उपसरपंचपदासाठी दावेदाऱ्या वाढल्या आहेत. जांभोऱ्यात देवदर्शनाचा खर्च आता कोण देणार, अशा चर्चांना पेव फुटले आहे.
खडकी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबूजी ठवकर यांच्या गटाला पाच जागा मिळाल्या, तर माजी उपसरपंच शर्मा बोंदरे यांच्या गटाला चार जागा जिंकता आल्या. परंतु, येथे सरपंचाचे आरक्षण सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी निघाल्याने बाबूजी ठवकर यांचे सरपंच होण्याचे स्वप्न भंगले. येथे शर्मा बोदरे गटाने संतोष व्यक्त केला. येथेही एकमेव उमेदवार असल्याने सरपंचाची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तर उपसरपंचपदासाठी बहुमताच्या गटात दावेदारी वाढल्या आहेत.
देव्हाडा येथे महादेव फुसे यांच्या सत्ताधारी गटाला धक्का देत माजी सरपंच भाऊराव लाळे व किशोर रंगारी गटाने ९ पैकी ६ जागा जिंकल्या. तर विरोधकांना केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. परंतु, देव्हाडा बुज येथे महिला आरक्षण आल्याने सत्ताधारी गटातील प्रमुख दोन्ही दावेदारांना धक्का बसला आहे. परंतु, येथे त्यांच्याच गटाची महिला सरपंचपदी विराजमान होण्याची शक्यता आहे.
पांजरा येथे चुरस तर केसलवाड्यात समाधान
पांजरा येथे सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा सत्ता काबीज ठेवण्यात यश मिळविले. येथे किरण शहारे व रूपेश माटे गटाला ७ पैकी ५ जागा मिळाल्या तर गौरीशंकर राऊत यांच्या गटाला केवळ २ जागा जिंकता आल्या. येथे आरक्षण सर्वसाधारणसाठी असल्याने सत्ताधाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, चुरस वाढणार असल्याने सरपंच कोण होणार, याची चिंता सतावत आहे. केसलवाडा येथे सत्ताधारी गटाला धक्का देत विरोधकांनी ७ पैकी ६ जिंकल्या तर सत्ताधान्यांना केवळ १ जागा मिळाली. येथे आरक्षण महिलेसाठी असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत असून बहुमताच्या गटाची महिला एकमताने सरपंच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.