गोसेखुर्द प्रकल्पातून दहा दिवसात ११४० दलघमी पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 05:00 AM2021-08-04T05:00:00+5:302021-08-04T05:00:17+5:30
गतवर्षी महापुराला कारणीभूत ठरलेल्या या प्रकल्पाचे पाणी यंदा नियंत्रितपद्धतीने सोडण्यात येत आहे. २३ जुलै रोजी सर्वप्रथम या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. तेव्हापासून दरारोज या प्रकल्पाचे दरवाजे कमी जास्त संख्येत उघडण्यात येत आहे. २ ऑगस्ट रोजी या प्रकल्पाचे ११ दरवाजे ११ मीटरने उघडण्यात आले होते. त्यातून ११९२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यासोबतच डाव्या कालव्यातूनही पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पाचा जलस्तर कायम ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गत दहा दिवसात प्रकल्पाचे दरवाजे उघडून ११४० दलघमी पाणी सोडण्यात आले. वैनगंगा नदी आणि गोसेखुर्द प्रकल्पाचा जलस्तर पावसाळ्यात वाढत आहे.
गतवर्षी महापुराला कारणीभूत ठरलेल्या या प्रकल्पाचे पाणी यंदा नियंत्रितपद्धतीने सोडण्यात येत आहे. २३ जुलै रोजी सर्वप्रथम या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. तेव्हापासून दरारोज या प्रकल्पाचे दरवाजे कमी जास्त संख्येत उघडण्यात येत आहे. २ ऑगस्ट रोजी या प्रकल्पाचे ११ दरवाजे ११ मीटरने उघडण्यात आले होते. त्यातून ११९२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यासोबतच डाव्या कालव्यातूनही पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दहा दिवसात तब्बल ११४० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
भंडारा-नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दोन लाख ५० हजार ८०० हेक्टर जमीन सिंचनाची क्षमता या प्रकल्पाची आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पातील जलसाठा २४३.११ मीटर असून पाण्याची टक्केवारी ४०.५९ टक्के आहे. गोसे गावाजवळ बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाची लांबी ११.३५ किमी असून उंची २२.५ मीटर आहे. पाणी साठवण क्षमता ११४६ दलघमी आहे. सद्यस्थितीत ३०३ दलघमी पाणीसाठा असतानाही पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून या प्रकल्पाचे पाणी नियंत्रित केले जात आहे.
पुनर्वसनाचा प्रश्न कायम
- गोसे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या काही गावांचे पुनर्वसन अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे हा प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरला जात नाही. त्यामुळेच या प्रकल्पात ४० टक्के पेक्षा अधिक पाणी संग्रहीत केले जात नाही. गोसेप्रकल्पाचे पाणी सोडल्यानंतर वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कारधा येथे वैनगंगा पातळी इशारा पातळीपेक्षा कमी
- भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची सोमवारी २४३.१२ मीटर पातळी मोजण्यात आली होती. येथे इशारा पातळी २४५ मीटर आणि धोका पातळी २४५.५० मीटर आहे. सद्यस्थितीत इशारा पातळीपेक्षा कमी पाणी आहे. मात्र लहान पुलाच्या मोऱ्या वैनगंगा दुथडी असल्याने बुजल्या आहेत. प्रशासनाने पुलावरील सुरक्षा कठडे काठले असून नागरिकांनी सावध रहावे, अशा सूचना दिल्या आहे.