खराशी : आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धेत विविध उपक्रमांमुळे लाखणी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळालेल्या खराशी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या पथकातर्फे पाहणी करण्यात आली.
खराशी ग्रामपंचायतीने या स्पर्धेत सहभागी होऊन लाखणी तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या अनुषंगाने खराशी येथील विविध उपक्रम आणि कागदोपत्री तपासणी करण्यात आली.
चौकांचे सौंदर्यीकरण, स्मशानभूमी तसेच पिण्याच्या पाण्याचे नियोजन, सांडपाण्याचे बंदिस्त गटाराच्या माध्यमातून व्यवस्थापन, ओला व सुका कचरा व्यवस्थापन, रेनवॉटर हार्वेस्टिंगचा उपयोग, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गावातील युवकांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन,संगणक कक्षाचे गावातील लोकांना उपयोग इत्यादी विविध उपक्रमांनी नटलेल्या या गावाची जिल्ह्यात तपासणी पथकातर्फे पाहणी करण्यात आली. या तपासणी समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत, विस्तार अधिकारी बोरकर तसेच सांख्यिकी विभागाचे मडामे आदींचा सहभाग होता. त्यांनी खराशी ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांचा लेखाजोखा तसेच गावाची पाहणी करून विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. खराशी येथील शाळेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर व त्यासाठी ग्रामपंचायतीने केलेले सहकार्य बघून तपासणी पथकाने गावकऱ्यांचेही कौतुक केले. गुणदानानंतरच गावाची निवड करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. तत्पूर्वी संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन सतीश चिंधालोरे, प्रास्ताविक उपसरपंच सुधन्वा चेटुले यांनी केले. मुख्याध्यापक सय्यद यांनी आभार मानले. कार्यक्रमादरम्यान सदर चमूने रावजी फटे विद्यालयात साकारलेल्या उद्यानाला भेट दिली. तसेच खराशी ग्रामपंचायतीचे कौतुक केले. सदर तपासणी उपक्रमासाठी सरपंच अंकिता झलके, ग्रामसेवक रवींद्र टोपरे, परिचर देवीदास बोंद्रे, पुरुषोत्तम बोंद्रे, शालू कठाणे, प्रकाश फटे यासह अन्य ग्रामस्थांनी सहकार्य केले.