लॉकडाऊनमुळे कामगारांना नोकरीची तर उद्योजकांना कामगार गावी जाण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:34 AM2021-04-15T04:34:21+5:302021-04-15T04:34:21+5:30
इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना महामारीने पुन्हा एकदा उद्योग जगतावर मंदीचे सावट आणले आहे. यामुळे ...
इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना महामारीने पुन्हा एकदा उद्योग जगतावर मंदीचे सावट आणले आहे. यामुळे कामगारांना आपली नोकरी जाण्याची तर उद्योजकांना कामगार गावी परत जाण्याची भीती सतावू लागली आहे.
भंडारा जिल्ह्यात हातावर मोजण्याइतपतच उद्योग आहेत. त्यातही अन्य गावातून किंवा परप्रांतातून आलेले मजूर परत जातील याबाबत चिंता व्यक्त आहे. कामगारांना नोकरीची चातकासारखी प्रतीक्षा करावी लागत असते. लॉकडाऊन उघडल्यानंतर कामगार आपापल्या उद्योगधंद्यात कामावर परत आले होते. राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदीची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतर ही स्थिती सामान्य रूपात येईल की नाही अशी धास्ती उद्योग जगतात पसरली आहे.
आधीच भंडारा जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात हवा तेवढा वाव नाही. त्यातही भंडारा जिल्ह्यातील अनेक बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगारही गेले आहेत. अशा स्थितीत लॉकडाऊनचा परिणाम गंभीर स्वरूपात पुन्हा एकदा जाणवण्याची धास्ती उद्योजक व कामगारांमध्ये व्याप्त आहे.
हाताला काम नाही, इथे तरी काय करणार?
गतवर्षीच्या आठवणी कायम आहेत. रोजगार जाण्यानंतर काय परिस्थिती असते, याची कल्पना न केलेली बरी. पण आता १५ दिवस हाताला काम नाही तर दामही मिळणार नाही. त्यामुळे आता इथे राहून काय करणार असा सवाल आहे. आता एक दोन दिवसात उदरनिर्वाह संदर्भात विचार करणार आहे.
- लक्ष्मीकांत रंगारी, कामगार, भंडारा
हाताला काम मिळेल किंवा नाही याची शाश्वती नाही. गरिबीत अनेक दिवस काढले. पहिल्यांदा नोकरी मिळाली तेव्हा कुठे घरची स्थिती सुधारली. गतवर्षी सहा महिने हाताला काम मिळाले नाही. अनेक अडचणींना सामना करावा लागला. पुन्हा लॉकडाऊनला सामोो जाताना भीती वाटत आहे.
- मुकेश तेलरांधे, कामगार, भंडारा
मोठ्या मुश्किलीने नोकरी मिळत असते. लॉकडाऊननंतर नोकरी मिळायला त्रास गेला. आता पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाण्याची हिंमत राहिलेली नाही. अनेक दिवस चटणी भाकर खाऊन दिवस काढले आता पुन्हा ती परिस्थिती आठवली की अंगावर शहारे येतात.
- मधू कोहाड, कामगार, भंडारा
कामगार गावी परतला तर
खऱ्या अर्थाने कुणालाही लॉकडाऊन नकोच आहे, मात्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. कामगार घरी परतले तर ते पुन्हा येण्याच्या मानसिकतेत नसतात. याचा परिणाम उत्पादनावरही बसत असतो. स्थिती सामान्य व्हायलाच हवी, यात कामगार व उद्योजक दोघांचे हित आहे.
- नितीन दुरगकर, उद्योजक, भंडारा
गतवर्षी कोरोना काळात अनेक लहान-मोठे उद्योग बंद झाले. उद्योग जगताची गाडी हळूहळू रुळावर आली. आता पुन्हा लॉकडाऊन सावटामुळे उद्योग जगतात चिंता पसरली आहे. पंधरा दिवसांनंतर स्थिती सामान्य झाली नाही तर कामगार पुन्हा येतील की नाही, यात शंका आहे.
- डिम्पल मल्होत्रा, अध्यक्ष, डिस्ट्रिब्युटर कन्झ्युमर प्रोडक्ट
अनेक ठिकाणी कामगार कमी जास्त प्रमाणात आपआपल्या उद्योग क्षेत्रात परतले होते. गाडी पुन्हा रुळावर आली होती. मात्र लॉकडाऊनमुळे कामगारांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते. परंतु कोरोना संकटामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. कामगार आहे तर कंपनी आहे, असेच आम्ही मानतो.
- जयंत गज्जर, उद्योजक, भंडारा
गतवर्षीची आठवण : जनता कर्फ्यूनंतर लॉकडाऊनमध्ये अनेक कारखान्यांतील कामगार व मजूर पायीच गावाकडे निघाले होते.
डोक्यावर साहित्य व मुलाबाळांचे ओझे सहन करीत अनेक किलोमीटर उन्हातान्हात गावाचा रस्ता धरला होता.
गावात परतल्यावर अनेकांना रोजगारही मिळाला नाही. अनेकांना रोहयोचा आधार मिळाला तर काहींनी मजुरीची कामे केली.