अडयाळ : गुरुवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला, तरी अडयाळ परिसरात नेरला उपसा सिंचन सुरू झाल्याशिवाय शेकडो शेतकऱ्यांची रोवणी पूर्ण होऊ शकणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन वर्षांत शेतकऱ्यांकडून अंदाजित ७० लाख रुपये पाणीकर येणे बाकी असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी फक्त अंदाजित दीड ते दोन लाख रुपये पाणीकर जमा झाला असल्याने अडचणी वाढल्या आहेत. अशी प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ पाणीपट्टीकर भरावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी हे सर्व शेतकऱ्यांना हवे असले, तरी ज्या शेतकऱ्यांकडे पाणीकर रक्कम बाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी गावातील पाणीवापर संस्था तथा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचे अधिकारी तथा कर्मचारी तथा आंबाडी कार्यालय यांच्याकडे तत्काळ रक्कम भरावी, असे आवाहन नेरला उपसा सिंचनने केले आहे. काही शेतकरी यासाठी पुढे येऊन थकबाकी भरताना दिसत आहेत.
गुरुवारी आलेल्या पावसामुळे पऱ्हे कसेतरी वाचले आहेत. पण, अजूनही धोका टळलेला नाही. याची जाणीव शेतकऱ्यांना आहे. कारण, पावसाने पुन्हा एकदा दडी मारली आहे. हीच स्थिती राहिली तर मग शेतकऱ्यांनी रोवणी करायची कधी? निसर्गाच्या लहरीपणामुळे नेरला उपसा सिंचनकडे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. प्रत्येक वेळी पाणी आणीबाणीच्या स्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा देणारी भूमिका मुख्य ठरते आहे. बुधवारपर्यंत नेरला उपसा सिंचनाचे पाणीसुद्धा सोडण्यात आले नाही, तर मग परिस्थिती बिकट होण्याच्या मार्गावर होती. परंतु, गुरुवारी पडलेल्या पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील पऱ्हे पुन्हा डोलू लागले आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी निसर्गाचे आभार मानत आहेत. आज पुन्हा शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे धास्तावले आहेत. याकडे संबंधित विभागाने तत्काळ लक्ष घालून नेरला उपसा सिंचनाचे पाणी द्यावे, अशीही मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.