लेखी आश्वासनानंतर अतिक्रमण धारकांनी सोडले उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:41 AM2021-09-15T04:41:01+5:302021-09-15T04:41:01+5:30
लाखांदूर : ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन गत कित्येक वर्षापासून निवासी सोयीने राहणा-या कुटुंबांना शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ ...
लाखांदूर : ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन गत कित्येक वर्षापासून निवासी सोयीने राहणा-या कुटुंबांना शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ देण्याच्या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते मात्र सदर उपोषणाची दखल घेत येथील तहसीलदार अखिलभारत मेश्राम, बीडीओ गजानन अगर्ते, सरपंच, ग्रामसेवक व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येत्या ३० सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय स्तरावर उपोषणकर्त्यांच्या मागणीच दखल घेतली जाणार या लेखी आश्वासनानंतर अतिक्रमण धारकांनी उपोषण सोडले आहे. सदरचे उपोषण १४ सप्टेंबर रोजी सोडण्यात आले आहे.
लाखांदूर तालुक्यातील सरांडी(बू) येथील काही कुटुंबांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करुन झोपड्यांचे बांधकाम करीत निवासी सोयीने कुटुंबांसह राहत आहेत. सदर झोपड्यांचे स्थानिक ग्रामपंचायतकडून घर कर देखील वसूल केला जात आहे. त्यानुसार येथील काही अतिक्रमण धारक कुटुंबांनी शासनाकडे घरकूल योजनेच्या लाभाची मागणी देखील केली आहे. सदर मागणीनुसार या गावातील काही कुटुंबांना शासनाकडून घरकूल योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र घर बांधकामासाठी उपलब्ध अतिक्रमित जागेच्या ग्रामपंचायतीच्या नमुना ८ अभिलेखात मालक म्हणून सरकार नोंद असल्याने घरकूल योजनेच्या लाभापासून अनेक कुटुंब वंचित ठरल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला होता. दरम्यान, गत कित्येक वर्षापासून अतिक्रमित जागेवरील झोपडीत निवासी वास्तव्याने राहत असताना ग्रामपंचायतीच्या नमुना ८ अभिलेखात सरकार नोंद करण्यात आल्याने घरकूल योजनेचा लाभ दिला जात नसल्याने घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी नमुना ८ मध्ये अतिक्रमणकर्त्यांच्या नावाची नोंद करण्याच्या मागणीला घेऊन लाखांदूर तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते.
उपोषणाची दखल घेत स्थानिक लाखांदूरचे तहसीलदार अखिलभारत मेश्राम, बीडीओ गजानन अगर्ते, विस्तार अधिकारी गडमडे, ग्रामसेवक सेलोकर, सरपंच बावणे आदी अधिकारी पदाधिकाऱ्यांद्वारे येत्या ३० सप्टेंबरपर्यंत आवश्यक कार्यवाही केल्या जाण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांद्वारे १४ सप्टेंबर रोजी उपोषण सोडण्यात आले. या उपोषणकर्त्यांमध्ये तालुक्यातील सरांडी(बू) येथील ग्रामपंचायत सदस्य रवी शहारे, श्रावण शहारे, दशरथ कवासे, प्रल्हाद मिसार, काशीराम भोपे, सुनीता घोरमडे, कैलास दिवठे, श्रीराम आठवले, गोपाल मिसार, ईश्वर मेश्राम यांच्या सह अन्य ४० महिला, पुरुष, नागरिकांचा समावेश होता.
140921\img20210914140930.jpg
लेखी आश्वासनानंतर ऊपोषण सोडण्यात आले ते क्षण