तुमसर : तुमसर तालुक्यातील कर्कापूर - रेंगेपार रस्ता मागील सात दशकांनंतरही दुर्लक्षित आहे. तीन किलोमीटरचा हा रस्ता असून अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरही अजूनपर्यंत बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही. शेकडो शेतकऱ्यांना निसरड्या रस्त्यावरूनच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
कर्कापूर - सिलेगाव हा रस्ता पावसाळ्यात चिखलमय होतो. सध्या रस्ता मातीचा आहे. दोन गावांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या रस्त्यावर आहेत. तसेच शेतीची कामे करताना निसरड्या रस्त्यावरून शेतकऱ्यांना जावे लागते. वयोवृद्ध शेतकरी या रस्त्यावरून जाऊ शकत नाहीत. जीव धोक्यात घालून त्यांना या मार्गावरून जावे लागते. मागील सात दशकांमध्ये रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मागील डिसेंबर महिन्यात संबंधित खात्याच्या अभियंत्यांनी रस्ता बांधकामाची हमी दिली होती. परंतु अजूनपर्यंत प्रत्यक्ष रस्ता बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे सरपंच प्रल्हाद आगाशे, उपसरपंच शरद आथीलकर, प्रवीण मिश्रा, गणेश सिंदपुरे, महादेव पडोळे, मुकुंद आगाशे आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कर्कापूर - सिलेगाव या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर माती व मुरूम काम करण्याकरिता ३० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. संबंधित खात्याच्या अभियंत्यांनी तसे आश्वासन दिले; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार प्रत्यक्ष शेतावरील बांधापर्यंत जाण्याकरिता रस्त्याची तरतूद करण्यात आली आहे. सदर रस्ता जुना आहे, परंतु या रस्त्याच्या विसर संबंधित बांधकाम विभागाला पडला आहे. कर्कापूर - सिलेगाव या तीन किमीच्या रस्त्याचे बांधकाम मागील सात दशकांपासून तसेच आहे. केवळ ३० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. परंतु येथे निधीची कमतरता असल्याचे सांगण्यात येते. येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष रस्ता बांधकामाला सुरुवात न केल्यास शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी दिला आहे.
०१ लोक ३१ के