आधुनिकता : पालकांनी लक्ष देण्याची गरजभंडारा : सध्याच्या किशोरवयीनांसह सर्वांनाच स्मार्टफोनबाबत कमालीचे आकर्षण पहायला मिळत आहे. आॅडिओ, व्हीडीओ पाहण्यात गुंग असणारी व तासनतास मोबाईलवर गेम खेळणारी बच्चे कंपनी आज घरोघरी दिसून येते. ही बाब अनेक पाहणी अहवालातून स्पष्ट झाली आहे. यामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. याकरिता मुलांना मोबाईलचा मर्यादितच वापर करू द्यावा, असा सल्लाही दिला जातो.तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माहिती, ज्ञान सहजगत्या मिळविता येते. मोबाईलमुळे ही बाब अधिकच सुकर झाली आहे. तरीही याचे दुष्परिणाम आज समोर येत आहे. घरात बाळ रडत असेल तर पालक त्याला मोबाईल देऊन शांत करताना दिसून येतात. स्मार्ट फोन हे बाळाला शांत करणारे खेळण ठरत असले तरी त्याचे दुरगामी परिणाम भयावह असण्याची शक्यता नाकारता येत आहे. मुलांना दीर्घकाळ करीता स्मार्टफोन देणाऱ्या पालकांनी या बाबी टाळायला हव्यात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. स्मार्टफोनचा झपाट्यााने झालेला प्रसार संवाद क्षेत्रात क्रांती घेऊन आला असला तरी याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. हा धोका वेळीच ओळखणे आवश्यक झाले आहे. अलीकडे लहान मुलामध्ये अँडव्हॉन्स स्मार्टफोनबाबत आकर्षण दिसत आहे. अतिरिक्त वापर धोकादायक असल्याने यावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) वाढत्या वयात आजाराच्या रुग्णात वाढलहान वयात स्थुलपणा वाढणे, शारीरिक क्षमता कमी होणे, नेत्रविकार, आक्रस्ताळेपणा वाढणे, चिडचिडपणा करणे, आक्रमकता वाढणे, भावनांचे संचलन करताना गोंधळणे, स्वमग्नता वाढणे, स्मरणशक्ती कमी होणे आदी लक्षणे आढळतात.वाढत्या वयात दिसणारे लक्षणे आजकाल किशोरवयातील मुलांत दिसतात. यात हदयविकार, रक्तदाब, मधुमेह या आजारांचे रूग्ण वाढत आहेत. याकरिता खबरदारी म्हणून पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा, कार्यात सहभागी करावे, मनोरंजनाची साधने वाढविणे असे उपाय करावे. बालपणापासून मुले तासनतास मोबाईलच्या सानिध्यात राहिले तर या वयात ज्या शारीरिक क्षमतेचा विकास व्हायला हवा तो होत नाही. यामुळे स्थूलताही वाढतो. सतत मोबाईल हाताळणाऱ्या मुलांत कालंतराने रक्तदाब, हदयविकार, मधुमेह अशी आजाराची शक्यता बळावत असते. यासाठी वेळेआधीच दक्षता घेणे आवश्यक आहे.- डॉ. देवेंद्र पातुरकर, शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रूग्णालय,भंडारा
स्मार्टफोनचे सर्वांनाच वेड
By admin | Published: July 08, 2015 12:47 AM