अंगावर वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू; लाखांदूर तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 04:51 PM2022-07-09T16:51:38+5:302022-07-09T17:20:03+5:30
शेतात पऱ्हे काढणीच्या कामात व्यस्त असताना दुपारी अचानक मेघ गर्जनेसह झालेल्या पावसात त्यांच्या अंगावर वीज कोसळली व त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
लाखांदूर (भंडारा) : खरीप हंगामा अंतर्गत शेतात धान पिकाच्या रोवणीसाठी धान पऱ्ह्याची काढणी करीत असतांना अचानक विज कोसळून एका शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास तालुक्यातील पुयार शेतशिवारात घडली. भिवा मणीराम भोयर (५०) रा पुयार असे वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतमजुराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास भिवा भोयर गावातीलच हितेश कापगते नामक शेतकऱ्याच्या शेतात धान रोवणीअंतर्गत पऱ्ह्याच्या काढणीसाठी मजुरीने गेले होते. दरम्यान, शेतात पऱ्हे काढणीच्या कामात व्यस्त असताना दुपारी अचानक मेघ गर्जनेसह झालेल्या पावसात त्यांच्या अंगावर वीज कोसळली व त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच आसपासच्या शेतशिवारातील अन्य मजुरांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती तालुका महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाला होताच संबंधितांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून मृतक शेतमजुराच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासन मदतीची मागणी केली आहे.