पालांदूर : लाखनी तालुक्यातील गुरढा येथील तलाठी वेळेत हजर राहत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजी शेतकरी सेवा संघटनेच्या नेतृत्वात तलाठी सजाला चक्क कुलूप ठोकले.
गुरढा येथील तलाठी सजाअंतर्गत गुरढा, गोंडेगाव व जेवनाळा या गावांचा कारभार पाहिला जातो. परंतु, तलाठी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. तीनही गावचे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सोमवारी सात-बारासाठी शेतकरी भरपावसात आले; मात्र तलाठी उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी राकेश पंधरे, नायब तहसीलदार धर्मेंद्र उर्कुडकर यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. सजापुढे तलाठी विरोधात शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करून कुलूप ठोकले. या आंदोलनात संभाजी शेतकरी सेवा संघटनेचे अध्यक्ष किशोर माेहतुरे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.