जीवाच्या भीतीपोटी बिबट्याचा बाथरूममध्ये तीन तास मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 05:00 AM2021-10-18T05:00:00+5:302021-10-18T05:00:20+5:30
शनिवारी एक बिबट रात्री ७ वाजताच्या सुमारास चिचगाव येथील लोकवस्तीत शिरला. यावेळी बिबट्याने बळीराम दोनाडकर नामक एका शेतक-याच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करीत त्याची शिकार केली. ही बाब शेळीपालक कुटुंबासह गावक-यांना दिसून येताच बिबट्याला हाकलून लावण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी घाबरलेल्या बिबट्याने स्वत:च्या बचावासाठी सीताराम वटी नामक इसमाच्या घराशेजारील बाथरूममध्ये आश्रय घेतला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : रात्रीच्या सुमारास शिकारीसाठी गावात शिरलेल्या बिबट्याने शेळीची शिकार केली. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. जीवाच्या भीतीपोटी बिबट्याने तब्बल तीन तास बाथरूममध्ये मुक्काम केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील चिचगाव येथे शनिवारी घडली. लाखांदूर येथील वनकर्मचारी व पोलिस प्रशासनाच्या पुढाकारात बिबट्याने सुखरूप जंगलाकडे धूम ठोकल्याने सर्वानीच सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना तालुक्यातील चिचगाव येथे १६ ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते १० वाजताच्या सुमारास हे थरारनाट्य घडले.
तालुक्यातील चिचगाव येथील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात बिबटसह अन्य वन्यजिवांचा वावर आहे. या जंगलातून काही वन्याप्राणी रात्रिच्या सुमारास शिकारीसाठी गावाकडे कुच करीत असतात. शनिवारी एक बिबट रात्री ७ वाजताच्या सुमारास चिचगाव येथील लोकवस्तीत शिरला. यावेळी बिबट्याने बळीराम दोनाडकर नामक एका शेतक-याच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करीत त्याची शिकार केली. ही बाब शेळीपालक कुटुंबासह गावक-यांना दिसून येताच बिबट्याला हाकलून लावण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी घाबरलेल्या बिबट्याने स्वत:च्या बचावासाठी सीताराम वटी नामक इसमाच्या घराशेजारील बाथरूममध्ये आश्रय घेतला.
बिबट बाथरूममध्ये शिरल्याने गावकऱ्यांनी याची माहिती लाखांदूर वन विभागासह पोलीस प्रशासनाला दिली. माहितीवरुन सहायक वन संरक्षक आर. पी. राठोड व वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक एस. जी. खन्डागळे, एम. ए. भजे, बी. एस. पाटील, एम. एस. चांदेवार, मेश्राम, डनदार, बडोले सह पोलिस निरिक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलिस अंमलदार मनिष चव्हाण यासह अन्य पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थाळ गाठले.
वन अधिकारी कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळावरून नागरिकांची गर्दी दूर केली. लोकांची गर्दी दूर होताच बाथरूममध्ये असलेल्या बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार केल्याची ही या महिन्यातील चिचगाव जंगल परिसरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी गत आठवड्यापूर्वी तालुक्यातील सोनी येथे एका बोकडाची शिकार बिबट्याने केली होती.
सतर्कतेचे आवाहन
- गत काही दिवसांपासून तालुक्यातील जंगल परिसरात मानव व वन्यजीव संघर्षाच्या घटनेत वाढ दिसून येत आहे. या परिस्थितीत जंगल परिसरातील नागरिकांनी हा संघर्ष टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन लाखांदूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी रुपेश गावीत यांनी केले आहे.