भंडारा : गावातील पाणीपुरवठा आणि पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यावरून झालेल्या वादात ग्रामसभेत तुफान हाणामारी झाल्याची घटना पवनी तालुक्यातील मौदी पुनर्वसन येथे बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या मारहाणीत सरपंचासह चारजण जखमी झाले आहेत. अड्याळ पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचे नागरिक तक्रार घेऊन दाखल झाले होते.
पवनी तालुक्यातील मौदी पुनर्वसन येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील समस्या नागरिक सांगत होते. त्यावेळी पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची वीज का कापली? यावरून वाद सुरू झाला. काही वेळातच वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. दुसरीकडे डोंगाघाट बंद करण्याचा मुद्दाही उपस्थित झाला. यावरूनच वचपा काढण्यासाठी ही हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे. हाणामारीत सरपंच जयश्री विनोद वंजारी, ग्रामसेवक संजयकुमार दलाल, ग्रामस्थ मनोज सूर्यभान वंजारी, ग्रामपंचायत सदस्य रूपाली मंगेश बांते आणि त्यांचे दोन महिन्यांचे बाळ जखमी झाले.
मौदी येथे ग्रामसभेत हाणामारी सुरू असल्याची माहिती होताच अनेकांनी ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेतली. या हाणामारीत मनोजच्या डोक्याला जबर मार लागल्याचे दिसत होते. ग्रामपंचायत कार्यालयात रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तत्काळ अड्याळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तोपर्यंत सर्व शांत झाले होते. यानंतर दोन्ही गटांचे नागरिक अड्याळ पोलीस ठाण्यात पोहोचले. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. या मारहाणीचा निषेध करण्यात येत असून मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या घटनेनंतर गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून, आता पोलीस कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
आईसोबत आलेला चिमुकला जखमी
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेला सदस्य रूपाली बांते आपल्या दोन महिन्यांच्या बाळासह उपस्थित होत्या. या हाणामारीत त्यांच्यासह बाळाच्या डोक्यालाही किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने वेळीच मारहाण करणाऱ्यांना आवरण्यात आल्याने चिमुकला बचावला. या ठिकाणी एकच गोंधळ झाला होता. कोण कुणाला मारत आहे हेही कळायला काही काळ मार्ग नव्हता.