तुमसर आगाराला सव्वा दोन कोटींचे आर्थिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:36 AM2021-05-27T04:36:41+5:302021-05-27T04:36:41+5:30
भंडारा जिल्ह्यात तुमसर आगार हा क्रमांक दोनच उत्पन्न मिळवून देणारा आगार आहे हे विशेष. ...
भंडारा जिल्ह्यात तुमसर आगार हा क्रमांक दोनच उत्पन्न मिळवून देणारा आगार आहे हे विशेष. कोराेनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लादले. त्यामुळे मागील अडतीस दिवसांपासून तुमसर आगारातील सुमारे ७० बसगाड्या आगारात थांबल्या आहेत. येथे दर दिवशी सहा लाख रुपयांचे उत्पन्न घेत होते. त्यामुळे ३८ दिवसांत सुमारे सव्वा दोन कोटींचे आर्थिक नुकसान आगाराला झाले आहे. सध्या आगारातून शासनाच्या निर्देशानुसार भंडारा नागपूर व गोंदिया येथे दररोज बस सोडण्यात येतात. बसमध्ये किमान प्रवासी संख्या २२ असणे गरजेचे आहे. या आगारातून बस सुटताना किमान १५ प्रवासी असले पाहिजेत. रविवारी आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. आगारात प्रवासी न आल्याने हा निर्णय घेण्यात आला. दररोज सकाळी ८ व सायंकाळी ४ वाजता येथून बसगाडी सोडण्यात येते.
ग्रामीण भागात बसगाड्या बंद : मागील ३८ दिवसांपासून तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच जिल्ह्यातील इतर भागात बसगाड्या सोडण्यात येत नाहीत. या लोकवाहिनीतून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करीत होते. कोरोनामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
कोट
भंडारा जिल्ह्यात तुमसर आगार आहे. हा आगार एसटी महामंडळाला क्रमांक दोनचा महसूल उत्पन्न मिळवून देणारा आगार आहे. अनलॉक झाल्याशिवाय पूर्वीप्रमाणे येथे वाहतूक सुरू होण्याची शक्यता कमी आहे. सध्या बसस्थानकावर शुकशुकाट दिसून येतो. लॉकडाऊननंतर प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे दररोज किमान सहा लाख रुपयांचे उत्पन्न या आगाराला मिळत होते. सध्या भंडारा, नागपूर व गोंदिया येथे किमान २२ प्रवाशी घेऊन बसगाडी सोडण्यात येते. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
युधिष्टिर रामचौरे, आगार प्रमुख तुमसर.