भंडारा : शहरात असलेल्या जिल्हा कारागृहात सध्या ३५७ कैदी आहेत. यामध्ये ३४७ पुरुष तर दहा महिला कैद्यांचा समावेश आहे. कारागृहातील ८ कैदी सध्या पॅरोलवर आहेत. जिल्हा कारागृहाची स्वतःची पाच ५.५४ हेक्टर शेतजमीन आहे. या शेतात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी कैद्यांनी पिकवलेल्याच शेतीतूनच दोन वेळेच्या जेवणात भाजीपाल्याचा वापर होत होता. मात्र कोरोना संसर्गामुळे सध्या ही भाजीपाला शेती थांबवली आहे. या कारागृहात कैद्यांची क्षमता ३४३ एवढी आहे. यामध्ये ३३८ पुरुष कैदी तर ५ महिला कैद्यांची क्षमता आहे. कारागृहाची शेती ही कोणालाही अभिमान वाटावा, अशी फुलवली होती. याच शेतीमधून भोपळा, वांगी, टोमॅटो, दुधीभोपळा, पालक, कोथिंबीर, वांगे व अन्य भाजीपाला पिके घेण्यात येत होती. यातूनच जिल्हा कारागृहातील बंदीवानांना दोन वेळच्या जेवणाचा आधार मिळत होता. मात्र सध्या कोरोनामुळे ही शेती कसताना अडचणी वाढल्या आहेत.
बॉक्स
कोरोनाने भाजीपाला शेती बंद झाल्याची खंत...
भंडारा जिल्हा कारागृहात असलेल्या पाच हेक्टर शेतीवर कोरोनापूर्वी भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जायचे. मात्र करोनाकाळात अनेक कैदी पॅरोलवर आहेत. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढल्याने शेतीचे नियोजन कोलमडले. मात्र कैद्यांच्या मेहनतीतून भाजीपाला शेती चांगलीच बहरली असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. एखाद्या शेतकऱ्यापेक्षाही सुंदर भाजीपाला पिकाचे उत्पादन जिल्हा कारागृहातील शेतीतून मिळत होते, मात्र कोरोनामुळे बंद झाल्याची खंत जिल्हा कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी व्यक्त केली.
बॉक्स
आठ कैदी पॅरोलवर
जिल्हा कारागृहात ३५७ कैद्यांपैकी ८ कैदी पॅरोलवर आहेत. कोरोनात काळजी म्हणून पॅरोलचा लाभ देता आला आहे. कोर्टाने ४५ दिवसांच्या बेलवर काहींना बाहेर सोडण्याचा निकाल दिला आहे. जिल्हा कारागृह प्रशासनाच्या वतीने कैद्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण तसेच आरोग्य जपण्याच्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.
बॉक्स
अशी असते कारागृहातील कैद्यांची दिनचर्या...
भंडारा जिल्हा कारागृहात सध्या ३५७ कैद्यांपैकी २७ कैदी हे क्वॉरंटाइन जेलमध्ये आहेत. त्यांना १४ दिवसांनंतरच कोरोना चाचणीचे निदान झाल्यावर जिल्हा कारागृहात प्रवेश दिला जातो. दररोज कैदी हे सकाळी साडेपाच वाजता उठतात. त्यानंतर सहा ते सव्वासहा वाजता हजेरी, व्यायामानंतर सात वाजता कैद्यांना नास्ता दिला जातो. त्यानंतर परिसरातील स्वच्छता झाल्यावर अकरा वाजता जेवण मिळते. दुपारी १२ ते ३ बंदी होते. त्यानंतर ३ ते ५ पर्यंत पुन्हा फिरणे, स्वच्छता व पाच वाजता पुन्हा संध्याकाळचे जेवण देऊन सहा वाजता कैद्यांची बंदी होते. अशी कैद्यांची दिवसभराची दिनचर्या आहे.
बॉक्स
नागपूरच्या धर्तीवर उभारले जिल्हा कारागृहाचे बांधकाम
भंडारा जिल्हा कारागृह हे नागपूरच्या धर्तीवर उभारण्यात आले असून, सध्या ३४७ पुरुष कैदी आहेत. तर दहा महिला कैदी आहेत. भंडारा जिल्हा कारागृह कारागृहाची क्षमता ३३८ पुरुष कैदी तर ५ महिला कैदी मिळून ३४३ कैद्यांची क्षमता आहे.
कोट
भंडारा जिल्हा कारागृहात ३४३ कैद्यांची क्षमता आहे. कारागृहकडे एकूण ५.५४ हेक्टर शेती आहे. या शेतीत भाजीपाला पिकांसह इतर पिके कोरोनापूर्वी घेतली जात होती. मात्र गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे आता शेतीला मर्यादा आल्या आहेत. कैद्यांसाठी लागणारा भाजीपाला आम्हाला कारागृहातील शेतीतूनच मोठ्या प्रमाणात मिळत होता. निवडकच भाज्या आम्हाला बाजारातून विकत घ्याव्या लागत होत्या. जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण, आरोग्याचे मार्गदर्शनही करण्यात येते.
राजकुमार साळी, जिल्हा कारागृह अधीक्षक, भंडारा